लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर्ण नियोजन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना रविवारी सादर करण्यात येणार आहे. नागपुरातून सेवाग्रामसाठी १० हजारांहून अधिक कार्यकर्ते रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.सेवाग्राम येथील बैठक व सभा ‘न भूतो न भविष्यति’ अशी व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीसह नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने नियोजनाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी याबाबत नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया भवन येथे बैठक झाली. या बैठकीत शहरातील एकूण तयारीचा आढावा घेण्यात आला. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्यापासून सर्व कॉंग्रेसच्या नेत्यांचे नागपूर विमानतळावर स्वागत करण्यापासून प्रत्येक लहानसहान बाबीची तयारी करण्यात आली आहे. याची जबाबदारी विविध पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली.सेवाग्राम येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होणारी पदयात्रा व जाहीर सभेसाठी नागपुरातून १० हजारांहून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत. शहरात कॉंग्रेसचे १८ ‘ब्लॉक’ असून प्रत्येक ठिकाणाहून किती कार्यकर्ते येतील याची यादीच तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.बैठकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यावर नेमकी कुठली जबाबदारी असेल, कोण किती कार्यकर्त्यांचे नियोजन करेल, इत्यादी जबाबदाऱ्यादेखील ठरविण्यात आल्या. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नाना गावंडे, अॅड.अभिजित वंजारी, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, सरचिटणीस जयंत लुटे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.राहुल, सोनिया गांधी यांचे २ आॅक्टोबरला आगमनदरम्यान, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचे नागपुरात २ आॅक्टोबर रोजी आगमन होईल. नवी दिल्लीहून ते नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता पोहोचतील व थेट सेवाग्रामकडे रवाना होतील. त्यानंतर सेवाग्राम येथे प्रथम कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक पार पडेल. त्यानंतर पदयात्रा होईल व अखेर सेवाग्राम येथेच जाहीर सभा होणार आहे. अ.भा.काँग्रेस कमेटीचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे हे १ आॅक्टोबर रोजीच नागपुरात दाखल होतील.व्हेरायटी चौकात एकत्र येणार शहर पदाधिकारी