नागपूर : नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची मंगळवारी सकाळी नागपुरात भेट घेतली. या भेटीत पवार यांनी ठाकरे यांना विजयासाठी ‘टीप्स’ दिल्या. दोन-तीन वेळचे अपवाद वगळता नागपूर हा काँग्रेसचा गड राहिला आहे. नागपूर जिंकणे काँग्रेससाठी कठीण नाही, असे सांगत पवार यांनी ठाकरे यांना आपण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास दिला.
ठाकरे यांनी पवार यांची भेट घेत नागपूरची एकूण राजकीय परिस्थिती मांडली. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही. एमआयएमचा उमेदवार रिंगणात नाही. आम आदमी पार्टीचे कॅडर ताकदीने काम करीत आहे. बसपाचा तेवढा प्रभाव दिसत नाही. आपण नगरसेवक, महापौर ते आमदार असा प्रवास केला असून, नागरिकांशी सतत संपर्कात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावर आपण नागपूरची माहिती घेतली आहे. येथील सामाजिक समीकरणांचाही आढावा घेतला आहे. येथे यावेळी काँग्रेस समोर मतविभाजनाचा धोका नाही, थेट लढत होत असल्यामुळे संधी आहे, असे पवार यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.
-भाजप विरोधात दिलेला उमेदवार निवडून यावा- केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यावेळी नागपूर जिंकतील का? असा प्रश्न मंगळवारी पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारला असता ते म्हणाले, भाजप विरोधात दिलेला उमेदवार निवडून यावा, अशी आमची इच्छा आहे.