नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या हायप्रोफाइल नेत्यांच्या नागपूर गृह जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या अध्यक्षाची निवडणूक या १७ ऑक्टोबरला होणार आहे.
सध्या जि.प.वर काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार फिलिंड लावली आहे. त्यामुळे आपल्या सदस्यांमध्ये फाटाफूट होऊ नये, भाजपच्या सापळ्यात कुणी अडकू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांनी ‘स्ट्रॅटजी’ आखली आहे. आतापासून उमेदवाराचे नाव जाहीर केले तर नाराजी वाढू शकते. त्यामुळे अर्ज नेमका कुणी भरायचा हे संबंधितांना १७ ऑक्टोबरला निवडणुकीच्या पूर्वी सांगितले जाणार आहे. एवढेच नव्हे तर सर्व सदस्यांना शुक्रवारी सकाळी एकत्र करून सुरक्षित स्थळी हलविले जाणार आहे.
मध्यंतरी काँग्रेस प्रदेश प्रतिनिधींच्या यादीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. मात्र, ते मतभेद बाजुला सारत गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक एकत्र आले. काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक घेतली. बैठकीत जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे, मनोहर कुंभारे, प्रकाश वसू आदी उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी सदस्यांनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य असेल, कुणीही दगाफटका करणार नाही, अशी हमी दिली. यावर नेत्यांनीही आपला सर्व सदस्यांवर विश्वास असल्याचे सांगितले. जे पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बैठकीत स्पष्ट केले.
भाजपची सावध भूमिका
- ५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे ३३ सदस्य असल्याने स्पष्ट बहुमत आहे. सोबतच काँग्रेसला राष्ट्रवादीच्या आठ व शेकाप, शिवसेना तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रत्येकी एक अशा एकूण ४४ सदस्यांचे समर्थन असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. संख्याबळ सोबत नसल्याने भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतली असून पडद्यामागे मात्र हालचाली सुरू आहेत. मात्र, राज्यात झालेला सत्तापालट पाहता बेसावध राहणे अंगावर येऊ शकते, त्यामुळे काँग्रेस नेते अलर्ट आहेत.
नाना कंभालेंच्या हालचालींवर नाराजी
- बैठकीत जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सदस्य नाना कंभाले यांच्या हालचालींवर नाराजी व्यक्त केली. कंभाले हे काँग्रेसच्या सदस्यांना एकट्यात भेटून सभापती करण्याचे प्रलोभन देत आहेत, अशा तक्रारी पुराव्यासह आपल्याकडे आल्या आहेत. त्यांना पक्षात फूट पाडायची आहे का, भाजपच्या सांगण्यावरून तर ते असे प्रकार करत नाहीत ना, असा सवालही भोयर यांनी नेत्यांच्या समक्ष उपस्थित केला. उपस्थित नेत्यांनी भोयर यांनी मांडलेल्या मुद्याची गंभीर दखल घेतली. जिल्हाध्यक्ष मुळक यांनीही काही सदस्यांनी आपल्याला फोन करून या प्रकाराची माहिती दिल्याचे सांगितले.
काँग्रेस सदस्यही म्हणणार.... ‘काय डोंगर, काय झाडी’
- शेवटच्या दोन- तीन दिवसांत भाजपकडून कोणत्याही सदस्याला प्रलोभन दिले जाऊ नये याची काळजी काँग्रेस नेते घेत आहेत. बैठकीत काँग्रेसच्या सर्व सदस्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता कपड्यांची बॅग भरून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर हजर राहण्याची सूचना देण्यात आली. सुत्रानुसार सदस्यांना अमरावती रोडवरील कोंढाळीजवळील एका रिसाॅर्टवर नेले जाईल. तेथून पुढे कुठे जायचे का, याचे नियोजन केले जाणार आहे.
मुळकांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक
- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या खामला येथील घरी गुरुवारी सायंकाळी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. तीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग, सलील देशमुख, बंडू उमरकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीने दोन पदांची मागणी केली. काँग्रेस नेत्यांनी त्यावर पूर्णपणे होकार दिला नाही. मात्र, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही दोन्ही पक्ष एकत्रित राहतील, असे बैठकीत ठरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत एक सभापती दिले जाण्याची शक्यता आहे.