- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळख लपवत लग्नाचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. त्याचा फोन तिने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासला असता हा प्रकार समोर आला. पाचपावली पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपी साहिल ऊर्फ अब्दुल शारिक कुरेशी अब्दुल कुरेशी (३३) याला अटक केली आहे.
साहिल टेका येथे पानटपरी चालवतो. तो बऱ्याच काळापासून त्याच्या पत्नीचा छळ करत होता. तिला तिच्या पतीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सापडले आणि तिने पाचपावली पोलिस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतरही साहिलच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. दरम्यान, त्याच्या पत्नीला १९ वर्षीय पीडित तरुणीवर त्याने अत्याचार केल्याची बाब समजली. पीडित विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत मंगळवार आणि शनिवारी पाचपावली येथील एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात असे. या दरम्यान साहिलने तिला पाहिले. त्याने तिच्या मित्राकडून तिचा नंबर घेतला. यानंतर स्वतःची ओळख विद्यार्थी म्हणून करून दिली. शहरात शिक्षणासाठी आलो आहे, असे त्याने तिला सांगितले. तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तो एका हॉटेलमध्ये आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला.
साहिलने तिचा व्हिडीओही बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. नंतर तो तिला पैसे मागू लागला. तिने आईची अंगठी विकून साहिलला ३० हजार रुपये दिले. जसजसा छळ वाढत गेला तसतसे विद्यार्थिनी त्याला भेटण्याचे टाळू लागली. साहिलने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. १ ऑक्टोबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत असाच प्रकार सुरू होता. त्याच्या पत्नीने त्याच्या मोबाईल व सोशल मीडियावर वॉच ठेवला. तिने वेब व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याचे चॅटिंग तपासले व तेव्हा साहिलच्या पत्नीला हा व्हिडीओ सापडला. तिने पुढाकार घेत तक्रार केली व पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत साहिलला अटक केली. साहिलने अनेक महिलांचे शोषण केले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.