नागपूर : आई आणि मोठ्या भावासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालून घरातील साहित्याची तोडफोड करणाºया युवकाला शांत बसविताना गळा आवळल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २८ जूनला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आई आणि भावाला अटक केली आहे.
प्रयाग उर्फ बंटी श्रीराम गौर (३४, रा. कुशीनगर जरीपटका) असे या भांडणात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रागीट स्वभावाचा होता. तो मोबाईल शॉपीत काम करायचा. तर प्रभात श्रीराम गौर (३६) आणि मीरा श्रीराम गौर (६०) दोघे रा. कुशीनगर जरीपटका अशी आरोपी आई आणि भावाची नावे आहेत. जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक प्रयागचा लहान भाऊ सुशांतचे दोन मित्र आणि त्यांच्या पत्नी घरी आल्या होत्या. बोलताना प्रयागचा सुशांतसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात प्रयागने मोठ्या भावाला लग्नात मिळालेले आलमारी फोडली. यावरून त्याच्या आईने प्रयागला विचारना केली असता त्याने रागाच्या भरात रिमोट टीव्हीला फेकून मारला. तो घरातील साहित्याची तोडफोड करीत असल्याचे पाहून त्याच्या आईने प्रयागचे पाय धरले आणि मोठा भाऊ प्रभातने त्याच्या गळा पकडला असता त्याचा गळा आवळल्या गेल्याने तो जागेवरच निपचित पडला. या प्रकरणी प्रयागचा भाऊ सुशांत श्रीराम गौर (३२) याने दिलेल्या सुचनेवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी आई आणि भावाविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.