नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे बहुतांश उद्योग, व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आल्याने आणि अनेकांची आर्थिक कोंडी झाल्याने काहीसा अडगळीत पडलेला हवाला व्यवसाय पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून, रोज पुन्हा कोट्यवधींची हेराफेरी हवाला व्यावसायिक करू लागले आहेत. शनिवारी चिंतेश्वर मंदिराजवळ लुटण्यात आलेल्या २१ लाखांच्या रकमेनंतर पुन्हा एकदा हवाला चर्चेत आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचेही लक्ष वेधले गेले आहे.
कधी ट्रेन, कधी ट्रॅव्हल्स कधी कार, तर कधी दुचाकीने हवालाची रोकड इकडेतिकडे करणारे व्यावसायिक पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी नवनवीन फंडे वापरतात. कुरिअर कंपन्या कधी पुस्तकात, कधी मिठाईच्या डब्यात तर कधी वेगवेगळ्या बॉक्समध्ये हवालाची रोकड पाठवितात. या गोरखधंद्याशी संबंधित असलेल्या टिपरकडून अधूनमधून त्यांचा भंडाफोड होतो आणि हवाला पुन्हा चर्चेत येतो. शनिवारी दुपारी चाकूच्या धाकावर तीन लुटारूंनी २१ लाखांची रोकड अन् ॲक्टिव्हा हिसकावून नेल्याने पुन्हा एकदा हवाला चर्चेत आला आहे.
देशाचा मध्यबिंदू असलेले नागपूर हवालाचेही केंद्रस्थान आहे. येथून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि चांद्यापासून तो बांद्यापर्यंत हवालाची रक्कम बिनबोभाट पोहोचवली जाते. छोटे-मोठे शंभरावर हवाला व्यावसायिक नागपुरात सक्रिय आहेत. त्यांच्याशी संबंधित एखाद्दुसऱ्यांदा रोकड पकडली गेली किंवा लुटली गेली की काही वेळेसाठी बोभाटा होतो आणि नंतर त्या प्रकरणाचे काय झाले, हे कळायलाही मार्ग नसतो.
पोलिसांनीच लुटले होते अडीच कोटी
नागपुरात हवालाची रोकड लुटण्याच्या आणि पकडल्या जाण्याच्या गेल्या १० वर्षांत डझनभर घटना घडल्या. त्यातील सर्वांत मोठी घटना २९ एप्रिल २०१८ रोजी घडली होती. रायपूरहून नागपूरला एका डस्टर कारमधून कोट्यवधींची रोकड येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोनोने याने आपल्या दोन कर्मचारी तसेच दोन कुख्यात गुंडांना हाताशी धरून हवालाच्या पाच कोटी ७३ लाखांपैकी २ कोटी ५५ लाखांची रोकड लुटली होती. लुटालुटीसोबतच हवालाची रक्कम पकडल्या जाण्याच्या घटना अलीकडे गोंदिया, अमरावती येथेही घडल्या. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील बच्चा बाबू गँगने बेछूट गोळीबार करून लखोटिया बंधूंची हत्या केली होती. त्या घटनेमुळे हवालाचे नागपूर कनेक्शन पहिल्यांदा उघड झाले होते.
काळ्या पैशाचा व्यवहार
हा संपूर्ण व्यवहार काळ्या धनाचा (ब्लॅक मनी) आहे. कच्चे की पत्ती (नंबर दोनची रोकड) म्हणून आणि असेच काहीसे कोडवर्ड वापरून हा व्यवहार केला जातो.
आधी दहशतवादी हवालामार्फत पैशाचा व्यवहार करायचे. नंतर अंडरवर्ल्ड, गुंड, खंडणीबाज हवाला करीत होते. आता काळ्याबाजारात गुंतलेले मोठमोठे व्यावसायिक, अवैध धंदे करणारी मंडळी हवालाच्या माध्यमातून लेनदेनचे व्यवहार करतात.
असे ठरते कमिशन
नागपुरातून आजूबाजूच्या छोट्या शहरात रोकड पोहोचवायची असेल तर एक लाख रुपयांमागे २०० ते ३०० रुपये कमिशन घेतले जाते. मात्र, हीच रक्कम, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता अथवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरांत पोहोचवायची असेल तर कमिशन ३०० ते ५०० रुपये ठरते. संबंधित सूत्रांनुसार नागपुरातून रोज २० ते २५ कोटींचा हवाला होतो.
-------