- योगेश पांडे नागपूर - शोरूममधून मोबाइल चोरून नेपाळमध्ये विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भंडाफोड करून दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन दोन्ही आरोपींना सिनेस्टाइल पद्धतीने अटक केली. आरोपींनी नागपुरातून २४ लाखांचे मोबाइल व इतर ई- गॅजेट्स चोरले होते. त्यांच्याकडून १७ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. झोन चारच्या उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दिघोरी येथील रहिवासी सचिन गावंडे यांचे स्मृतीनगरात मोबाइलचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री शटर तोडून चोरट्यांनी ८९ मोबाइल फोन, बड्स, नेकबँड व घड्याळे असा एकूण २४.३२ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपी पायी आले होते. घटनेनंतर ते ऑटोमध्ये बसून स्टेशनवर पोहोचले. पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले आणि मोबाइल सर्व्हेलन्सवरून आरोपींचा माग काढला. त्यानंतर तपास पथक उत्तर प्रदेशातील गाझियाबादला पाठवण्यात आले. तेथे पोलिसांनी मोहम्मद मुस्तकीम उर्फ सलमान मोहम्मद मुरसलीन (२३ वर्ष, रा. डासना) याचा पत्ता शोधला. त्याच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर पोलिसांनी वॉच ठेवला व त्याला अखेर सिनेस्टाइल ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचा दुसरा साथीदार मोहम्मद शहजाद मोहम्मद फारूख (४२, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) यालादेखील अटक करण्यात आली. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर, एपीआय पंकज चक्रे, शैलेश ठवरे, नंदकिशोर तायडे, गणेश बोंदरे, राजेश मोते, मुकेश कन्हाके, राजेश धोपटे, ओमप्रकाश मते, गौरव गजभिये, हिमांशू पाटील, कुणाल उके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गावात लपवून ठेवले होते मोबाइलआरोपींनी मोहम्मद मुस्तकीम याच्या डासना या गावात मोबाइल लपवून ठेवले होते. पोलिसांनी तेथून १७.१८ लाख रुपये किमतीचे ७२ मोबाइल फोन जप्त केले. तिसरा आरोपी इकबाल (गाजियाबाद) हा फरार आहे. मुस्तकीम हा या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने वर्षभराअगोदर हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मोबाइल शोरूममध्ये चोरी केली होती. त्याच्यावर अकोला येथे दोन, तर बेळगावात एक गुन्हा दाखल आहे. तो त्याच्या मित्रांसोबत वेगवेगळ्या शहरांत जातो. शहराच्या सीमेवरील भागातील मोबाइल शोरूम फोडून आरोपी मालासह फरार होतात.
नेपाळमध्ये विकतात मोबाइलआरोपींनी तीन पोत्यांमध्ये मोबाइल भरून रेल्वेस्थानक गाठले. तेथून ते दिल्लीला गेले. आरोपी चोरलेले मोबाइल नेपाळमध्ये विकायचे. आरोपींनी यातील काही मोबाइल स्थानिक लोकांनाही विकले आहेत, तर काही नातेवाइकांना भेट दिले.
भाच्याला मोबाइल गिफ्ट दिला आणि बिंग फुटलेआरोपी मुस्तकीमने त्याच्या बहिणीच्या मुलाला वाढदिवसानिमित्त चोरलेला एक मोबाइल गिफ्ट दिला. त्याने लगेच सिम कार्ड टाकून मित्रांशी गप्पा सुरू केल्या. मोबाइल सुरू होताच पोलिसांना सायबर सेलच्या पथकाच्या मदतीने गाझियाबादची ‘लिंक’ मिळाली आणि मग पुढील पावले उचलण्यात आली.