लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे अनेकांना आपल्या आत्पस्वकीयांचे अखेरचे दर्शन घेणे अवघड झाले आहे. उमरेड रोड, साईनगर, दिघोरी येथे राहणारे रामकृष्ण लटारुजी मोहितकर (५९) यांचे निधन झाले. रामकृष्ण यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा कपिल सध्या नेदरलॅण्डला आहे. वडिलांचे अकाली निधन झाल्याने मुलाला त्यांच्या अंत्यदर्शनाला येणे शक्य झाले नाही. पण त्यांची मोठी मुलगी शुभांगी नितीन झाडे ही नागपूरला राहते. तर दुसरी मुलगी संजीवनी सुभाष आमने ही पारडसिंगा व लहान मुलगी हर्षदा बदकी ही न्यूझीलंड येथे राहते. त्यामुळे मुलगा व एक मुलगी अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत. मुलगा पोहचूच शकत नसल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मोठी मुलगी शुभांगी झाडे हिने वडिलांना मुखाग्नी दिला. ह्रदय हेलावणाऱ्या अशा अनेक घटना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लावलेल्या संचारबंदीमुळे दृष्टीस पडत आहे. पण धोका कोरोनाचा आहे. त्यामुळे अशा भावनिक सोपस्कारांना बगल देण्याशिवाय पर्याय नाही.
नागपुरात अखेर मुलीलाच पार पाडावे लागले अंत्यसंस्काराचे सोपस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 9:51 PM