लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मजुराचे मुले मजूर आणि राजाची मुले राजेच बनतील, हा काळ आता राहिला नाही. गुणवत्ता तळागाळात आहे आणि त्या गुणवत्तेला पैलू पडण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. म्हणूनच अत्यंत कठीण परिस्थितीत जगणारेही शिक्षणाच्या भरवशावर मोठी स्वप्ने पाहत आहेत आणि ती पूर्ण करण्याचे धाडसही करत आहेत. अशाच हातमजुरी आणि धुणीभांडी करणाऱ्या पालकाच्या मुलीने दहावी स्टेट बोर्डाच्या उत्तम यश प्राप्त करत कलेक्टर बनण्याच्या दिशेने पाहिले पाऊल ठेवले आहे.
वाठोडा श्रावणनगरात राहणाºया सुहानी ढोके हिने दहावित ९४.४० टक्के गुण घेत विश्वास माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत. तिचे वडील किशोर ढोके हातमजुरी करतात तर कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा म्हणून तिची आई विद्या या हॉटेलमध्ये धुणीभांडी करतात. सुहानी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे आणि शाळेतील शिक्षक तिला विविध स्पर्धांमध्ये प्रोत्साहन देत असतात. विविध संस्थांकडून घेतल्या जाणाºया राज्य व जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ती गेल्या तीन वर्षांपासून प्रथम क्रमांक पटकावत आहे. आई-वडील दोघेही मोलमजुरी करत असल्याने कुटुंबाचा रहाटगाडा चालतो आहे. मात्र मजुरांची मिळकत किती असते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्या अनुषंगाने सुहानीने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने दहावीच्या अभ्यासास सुरुवात केली. मैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने अतिरिक्त ट्युशन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेवत नंतर ट्युशनचा नाद सोडला.
सकाळी ५ वाजता उठणे, व्यायाम करणे आणि सकाळी ७ वाजतापर्यंत अभ्यास करणे, ही तिची दिनचर्या. नंतर शाळेतील अभ्यास करणे आणि शाळेत जाणे. अश्या नियोजनबद्ध प्रक्रियेतून तिने ९४.४० टक्के गुण प्राप्त केले. आता विज्ञान शाखेत गोडी असल्याने ११ वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे आणि एक एक टप्पा गाठत कलेक्टर बनण्याचे स्वप्न साकार करणार आहे.