नागपूर : धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. गत ४८ तासांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धा वनराज पाटील (२२) रा.धामना हिचा शनिवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर रविनगर येथील दंदे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. या स्फोटातील अन्य एक जखमी प्रमोद चवारे (२५) रा. नेरी यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या कंपनीत गनपावडरपासून सेफ्टी फ्युज व मायक्रोकॉर्डचे उत्पादन केले जात होते. यात घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाला होता तर तीन गंभीर जखमीवर नागपुरात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री दानसा मरसकोल्हे (२६, धमनिया (फुलसंच), ता.परासिया, मध्य प्रदेश) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ६ च्या सुमारास कंपनी परिसरात प्रचंड रोषाचे वातावरण असताना श्रद्धा हिच्यावर खासगी इस्पितळातून पैशाअभावी चांगले उपचार होत नसल्याचा निरोप आला अन् नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला होता. यानंतर तिला दंदे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. श्रद्धा हिचा मृत्यू झाल्याचे कळताच आ.अभिजीत वंजारी, माजी जि.प.अध्यक्षा सुनीता गावंडे, जि.प.सदस्य भारती पाटील, शैलेश थोराने यांनी दंदे हॉस्पीटल गाठत तिच्या नातेवाईकांचीही भेट घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. याशिवाय प्रमोद चवारे यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली.या प्रकरणात पोलिसांनी कंपनीचा संचालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला होता. यानंतर, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अटक केली. मात्र, त्या दोघांविरोधातही जामीनपात्र कलमे लावण्यात आली असल्याने त्यांना न्यायालयातून जामीनही मिळाला आहे.