- योगेश पांडे नागपूर - देशातील महिलांवरील वाढते अत्याचार ही गंभीर समस्या आहे. मात्र पिडीत महिलांना लवकर न्याय मिळण्यात होणारा विलंबदेखील चिंताजनक आहे. उशिरा निकाल लागण्यामुळे अनेक पिडीत मुली-महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले. देशात महिला अत्याचार संदर्भातील कायद्यांमध्ये बदलांची गरज आहे. तसेच या प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेचा वेग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. नागपुरात राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सोनल मानसिंह, प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री, विदर्भ प्रांत कार्यवाहिका मनीषा आठवले आणि नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे उपस्थित होत्या. महिला अत्याचाराच्या घटना निंदनीयच आहे. त्या महिलांना न्याय मिळणे गरजेचे आहे. सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर करणे व न्यायव्यवस्थेला वेगवान करणे ही काळाची गरज आहे. देशातील सरकार व न्यायव्यवस्थेने मिळून याबाबतीत विचार करायला हवा. सोबतच समाजातदेखील जागृती आवश्यक आहे. मुला-मुलींमध्ये संयमाची निर्मिती केली पाहिजे. त्यांच्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न विविध ठिकाणी झाले पाहिजे. महिलांनी आपल्यातील सौम्य आणि रौद्र शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करावा. तसेच कुटुंब प्रबोधनातून हिंदू जीवनमूल्यांचे काळानुरुप आचरण करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन शांताक्का यांनी केले.आपल्या देशात अनेक कर्तुत्ववान महिलांनी योगदान दिले आहे. देशाच्या कणाकणात महिलाशक्ती आहे. आपल्याला या शक्तीचा वारंवार आवाहन करावे लागेल आणि त्या शक्तीला जागवावे लागेल. महिलांनी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. दुराचारी शक्तींच्या नाशासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ आपण एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.सोनल मानसिंह यांनी व्यक्त केले.योवळी समितीच्या सेविकांनी घोष तसेच इतर शारीरिक प्रात्यक्षिके विविध रचनांसह सादर केली. यात प्रामुख्याने योगासने, रिबिन योग, लेझिम, नियुद्ध, दंड, व्यायामयोग यांचा समावेश होता. अदिती कोलारकर यांनी वैयक्तिक गीत गायले. अदिती देशमुख यांनी संचालन केले. नागपूर विभाग सहकार्यवाहिका वृषाली पुणेकर यांनी आभार मानले. यावेळी समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हेदेखील उपस्थित होते.
Nagpur: "महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निर्णय वेग वाढावा", शांताक्का यांची मागणी
By योगेश पांडे | Published: October 04, 2024 10:26 PM