लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय हे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातील रुग्णांसाठी आशेचे केंद्र ठरले आहे. यातच सेवा, दर्जा, यंत्रसामग्री, संशोधन, विविध उपक्रम आदी निकषांवर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात उत्कृष्ट संस्थांच्या यादीत देशात या महाविद्यालयाला चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. या सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची संस्था निवडण्यास मदत होत असल्याने याला महत्त्व आले अहे.
दंत महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९६८ मध्ये झाली. रुग्णालयातून उच्च दर्जाची सेवा दिली जात असल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. विशेषत: रुग्णालयात मुखपूर्व कर्करोगाचे निदान केले जाते. गुटखा व तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या या रोगाबाबत संशोधन तसेच वैद्यकीय पुरावे शासनाला उपलब्ध करून दिले जाते. यामुळे महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांनी सांगितले, देशातील प्रतिष्ठित असलेल्या ‘आऊटलूक’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. भारतातील उत्तम व्यावसायिक संस्थांचे ‘आयकेअर रँकिंग २०२०’चे सर्वेक्षण सप्टेंबर महिन्यात झाले. त्यानुसार ‘आऊटलूक’ने १८ संस्थांची यादी प्रसिद्ध केली. यात सहा शासकीय तर १२ खासगी संस्थांचा समावेश आहे. यादीत नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने चौथे स्थान पटकाविले. यात महाराष्ट्रातील केवळ तीन संस्था आहेत. मुंबई येथील नायर दंत महाविद्यालय व रुग्णालय तिसऱ्या स्थानी, तर पुण्याचे मारुती विद्यापीठ दंत महाविद्यालय हे १२व्या स्थानी आहे. शैक्षणिक व संशोधनीय गुणवत्ता, व्यावसायिक कार्यक्षमता, सोयीसुविधांची उपलब्धता, प्रवेक्ष क्षमता आणि प्रशासकीय तत्परता आदी मुद्द्यांवर विशेष गुण मिळाले.
डॉ. फडनाईक यांनी महाविद्यालयातील अध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला या यशाचे श्रेय दिले. ते म्हणाले, शासकीय दंत महाविद्यालयाचे २०१७-१८ हे सुवर्ण जयंती वर्ष होते. या निमित्ताने मागील वर्षी सुपर स्पेशालिटी दंत हॉस्पिटलचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात झाली. लवकरच हे हॉस्पिटल रुग्णसेवेत सुरू होऊन रुग्णांना अद्ययावत सोयी उपलब्ध होतील.