नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवर दुपारी ४:०५ वाजताची वेळ...चितारओळ चौकाकडून मेयो इस्पितळाच्या दिशेने वाहनचालक जात असताना मोटारसायकलच्या इंजिनचा आवाज घुमू लागला अन् काही क्षणांतच दोन मोटारसायकलस्वार वेगाने आडवीतिडवी, मनमानी पद्धतीने समोर गेल्या. दोन्ही मोटारसायकलस्वारांमध्ये रेस सुरू होती व इतर वाहनांना वेगाने कट मारत दोघेही समोर जात होते. यामुळे कुणी अचानक दचकले, तर कुणी जिवाच्या भीतीने जागेवरच ब्रेक मारले. भर दुपारी नागपूरच्या रस्त्यावर धूमस्टाईल रेसिंग सुरू असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मार्गावर एकही पोलिस नव्हता. जर एखाद्या सेकंदाचे गणित चुकले असते तर एक तर मोटारसायकलस्वाराचा जीवघेणा अपघात झाला असता किंवा त्यांनी तरी रस्त्यांवरून जाण्याची हिंमत दाखविणाऱ्या एखाद्या नागपूरकराला उडविले असते.
रामझुल्यावर रितीका मालू या धनाढ्य गृहिणीने दारूच्या नशेत कार चालवत दोन निष्पाप तरुणांचा जीव घेतला. त्यानंतर शहरातील वाहनांच्या वेगाच्या थराराचा मुद्दा चर्चेत आला आहे. नागपूर पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात महत्त्वाच्या चौकांमध्ये अद्यापही वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या मोटारसायकलच्या रेस दररोज शहराच्या विविध भागांमध्ये लागतात. मौजमस्तीच्या नावाखाली हे अतिउत्साही तरुण इतरांचा जीव धोक्यात घालत असतात. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर होता. शहरात सीसीटीव्हीचे जाळे असताना कंट्रोल रूमलादेखील हा प्रकार दिसू नये ही तर आणखी आश्चर्याची बाब आहे. पोलिसांना याबाबत विचारणा केली तर आमच्याकडे तक्रार आली नसल्याने कारवाई काय करणार असेच उत्तर त्यांच्याकडून मिळणार. त्यामुळे अशा माजोरड्या मोटारसायकलस्वारांवर कारवाईसाठी नागरिकांनी कुणाकडे पाहावे, असा सवाल उपस्थित होत आहे.