- आनंद डेकाटे नागपूर - वीज बिलाच्या ७१.४२ कोटी रूपयाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणची मोहीम वेगाने सुरू आहे. वारंवार विनंती करूनही बिल न भरणाऱ्या बहुतांश ग्राहकांची वीज ३१ मार्चपर्यंत बिल न भरल्यास खंडित करण्यात येणार आहे. दरम्यान, महावितरणने डिजीटल प्रणालीद्वारेही नोटीस पाठवून कनेक्शन तोडता येईल, असे स्पष्ट केले आहे. महावितरणचे म्हणणे आहे, कंपनी वीज कायद्याच्या कलम ५६ अंतर्गत व्हॉट्सॲप, एसएमएस, ई-मेलवर नोटीस पाठवून पुरवठा खंडित करू शकते. कारवाई टाळण्यासाठी वीज नियमित भरण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. यासोबतच ग्राहकांच्या सोयीसाठी नागपूर परिमंडळात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीज बिल संकलन केंद्र सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. २४, २९, ३०, ३१ मार्च रोजी शनिवार आणि रविवार सार्वजनिक सुट्ट्या आहेत. आता हे सर्व दिवस वीज बिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. याशिवाय महावितरणची वेबसाइट, मोबाइल ॲप, पेमेंट वॉलेट आदींद्वारेही ऑनलाइन पेमेंट करता येते.
त्वरित बिल भरल्यास एक टक्के सवलतवेळेपूर्वी वीजबिलाचा भरणा केल्यास महावितरण ग्राहकांना त्वरित पेमेंटमध्ये सवलत देते. याअंतर्गत ग्राहकांना एक टक्का सवलत दिली जाते. ऑनलाइन बिल पेमेंटवर ०.२५ टक्के दिलासा दिला जातो. तुम्ही कागदी बिलांऐवजी ऑनलाइन बिल घेण्याचा गो ग्रीन पर्याय निवडल्यास, प्रत्येक बिलावर १० रुपये सवलतही दिली जात आहे.