लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र २ लाख ३५ हजार हेक्टर हे कापसाच्या लागवडीखाली येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे. २ लाख ३५ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार ४ हजार ५०० क्विंटलवर बीटी कापसाचे बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रानुसार ८५ हजार क्विंटलवर बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल भाताचे (धान) लागवडी क्षेत्र राहणार आहे. यंदा भाताचा पेरा ९५ हजार हेक्टरवर होणार आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा यंदा ८५ हजार हेक्टरवर पेरा राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. संकरित ज्वारीच्या लागवडीचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले आहे. मक्याचा पेरा ५ हजार हेक्टरवर राहणार आहे. तर तीळ ३०० हेक्टरवर लावले जाणार आहे. उडीद, मूग प्रत्येक १५०० हेक्टरवर लावण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. उसाचा पेरा ३ हजार हेक्टरवर राहणार आहे. कापूस बियाण्यांची टंचाई नाही. कृषी विभागाने महाबीजकडे २० हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय सर्वच पिकांचे अधिक उत्पादन देणाऱ्या प्रचलित वाणांचे दर्जेदार बियाणे कृषी सेवा केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांची उपलब्धतासुद्धा समाधानकारक असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवातकापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावागावात सोशल मीडिया (व्हॉट्सअॅप)च्या माध्यमातून कृषी सहायक शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहे.