लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ग्रामीण भागात ग्रा.पं.च्या मतदानाविषयी युवकात उत्साह दिसून येत आहे.
एकूण १३० नियोजित ग्रामपंचायतींपैकी सोनपूर (कळमेश्वर) व जटामखोरा (सावनेर) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यासोबत कुही तालुक्यातील देवळी कला ग्रामपंचायतीची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे १२७ ग्रामपंचायतींमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
१२७ ग्रामपंचायतींच्या ४३१ पैकी ४११ वॉर्डात ही निवडणूक होत आहे. येथे ११९६ जागांपैकी १०८६ जागांसाठी मतदान होईल. यासाठी ३०१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप समर्थीत पॅनल अशी लढत होत आहे.निवडणुकीसाठी १३ तालुक्यात ४८५ मतदान केंद्रांवर १४५५ मतदान अधिकारी - कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतदान केंद्रनिहाय ४८५ केंद्रप्रमुख व मतदान केंद्र अधिकारी यांचा समावेश आहे. या निवडणुकीची ११ डिसेंबर २०२० रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
१३ तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काटोल तालुक्यात ३ ग्रामपंचायतींच्या ९ वॉर्डातील २३ जागांसाठी मतदान होत आहे. नरखेड तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या ५५ वॉर्डापैकी प्रत्यक्ष ५४ वॉर्डात १३३ जागांसाठी मतदान होत आहे. सावनेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या ३८ वॉर्डातील ९६ जागांसाठी मतदान होत आहे. कळमेश्वर तालुक्यात ४ ग्रामपंचायतींच्या १३ वॉर्डातील ३७ जागांसाठी मतदान सुरु आहे. रामटेक तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या ३२ वॉर्डातील ८२ जागांसाठी , पारशिवनी तालुक्यात १० ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ८० जागांसाठी, मौदा तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ५८ जागांसाठी, कामठी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ३१ वॉर्डातील ८५ जागांसाठी, उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ४३ वॉर्डातील ९४ जागांसाठी, भिवापूर तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या ९ वॉर्डामधील २७ जागांसाठी, कुही तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या ७८ वॉर्डातील १८६ जागांसाठी, नागपूर ग्रामीणमधील ११ ग्रामपंचायतींच्या ४७ वॉर्डातील १३२ तर हिंगणा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या १७ वॉर्डातील ५९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.