लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रकोपानंतर पहिल्यांदाच सर्वांत कमी मृत्यूची नोंद झाली. रविवारी ७३ रुग्ण व ३ मृत्यू झाले. यात शहरातील ३५ रुग्ण, १ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये सुद्धा ३५ रुग्ण व शून्य मृत्यू नोंदविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या ४,७६,४१५ झाली तर, मृतांची संख्या ९००४ वर पोहचली.
नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण व मृत्यूची संख्या कमी होत आहे. आज झालेल्या ९०४३ चाचण्यांमधून ०.८० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरात ६८४३ चाचण्यांमधून ०.५१ टक्के, तर ग्रामीणमध्ये २२०९ चाचण्यांमधून १.५८ टक्के रुग्ण बाधित आढळून आले. कोरोनाचा दुसऱ्या लाटेपूर्वी, २७ जानेवारी रोजी ३ रुग्णांचे मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर १३७ दिवसांनी या मृत्यूच्या संख्येने बरोबरी केली आहे. आज कोरोनातून १९५ रुग्ण बरे झाले. यात शहरातील १३०, तर ग्रामीणमधील ६५ रुग्ण आहेत. आतापर्यंत शहरातील ३,२५,७४३, तर ग्रामीणमधील १,३९,७३२ असे एकूण ४,६५,४७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७० टक्क्यांवर पोहोचले आहे.
कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या आत
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८०८ होती. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या ५१०५वर पोहोचली. त्यानंतर ती वाढतच गेली. ३१ मार्च रोजी ३९,३३१, तर ३० एप्रिल रोजी ७६,७०६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. मात्र मे महिन्यापासून यात घट होऊ लागली. ३१ मे रोजी ६२६१ तर १३ जून रोजी पहिल्यांदाच दोन हजारांच्या आत, १९३६वर आली.
-शहरात ५२८७, ग्रामीणमध्ये २३०५ मृत्यू
शहरात आतापर्यंत ३,३२,१२६ रुग्ण व ५२८७ मृत्यू झाले आहेत. मृत्युदर १.५९ टक्के आहे. तर ग्रामीणमध्ये १,४२,६९५ रुग्ण व २३०५ मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युदर १.६१ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात रविवारी ४१६ रुग्ण विविध रुग्णालयांत तर, १५१८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते.