गणेश हूड नागपूर : राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. मुदतवाढीमुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊनची समस्या यामुळे शिक्षण विभाग त्रस्त आहे.
संच मान्यतेसाठी ३० एप्रिल पर्यंत आधार नोदणी व प्रमाणिकरण बंधनकारक केले होते. परंतु ७७ टक्के आधार अपडेट झाले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अजूनही या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. त्यात हजारो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डातील तपशील जुळत नाही, असे अडथळे येत आहेत. जिल्ह्यातील काम हळूहळू सुधारत असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ३४ हजार ३३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९० हजार ८०४ विद्यार्थी अद्यापही आधार अपडेट नाही. यामुळे पटसंख्या कमी दिसत असल्याने शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. बनावट बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक पदे भरण्यात आल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदविण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत होती. याला मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अडथळा शाळा-प्रशासन स्तरावर विद्यार्थ्यांचे आधार अपलोडिंग आणि राज्यस्तरावर तपासणीचे काम सुरुच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अजूनही काढलेली नाहीत. अनेकांनी ती अद्ययावत केलेली नाहीत. शाळेतील नोंदणीशी विद्यार्थ्यांच्या आधारवरील माहिती जुळत नाही. त्यात सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी असल्याने ऑनलाईन कामांना गती नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे.