दयानंद पाईकराव
नागपूर : एसटी महामंडळ सध्या आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्यामुळे अनेकदा आगारातील डिझेल संपले की एसटी बस रद्द होतात. त्यासाठी एसटी महामंडळाने तोडगा काढला आहे. एसटी महामंडळात बॅटरीवर धावणाऱ्या बस आणण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर विभागाला ६५ बस मिळणार आहेत.
-या मार्गावर धावणार बस (बॉक्स)
सध्या भंडारा आणि वरुड मार्गावर एसटीच्या ५५ पेक्षा अधिक बस धावतात. त्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या ६५ बस नागपूर विभागाला मिळाल्यानंतर या बस भंडारा आणि वरुड मार्गावर चालविण्यात येतील, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चार्जिंग स्टेशन
बॅटरीवर धावणाऱ्या बसची बॅटरी नियमित चार्जिंग करावी लागते. त्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. नागपूर विभागाने नागपूर आणि भंडारा येथे चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटरीवर धावणाऱ्या बस आल्यानंतर त्या नागपूर आणि भंडारा येथे चार्ज करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
खर्चात होणार बचत
एसटी महामंडळात अलीकडच्या काळात डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बॅटरीवर धावणाऱ्या बस आल्यानंतर महामंडळाचा आर्थिक फायदा होणार आहे. सध्याच्या तुलनेत महामंडळाची ३० टक्के रक्कम वाचणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० टक्के बचत होणार
‘बॅटरीवर धावणाऱ्या बस आल्यानंतर डिझेलवर होणारा खर्च बंद होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची ३० टक्के बचत होण्याची अपेक्षा आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..........