नरेश डोंगरे
नागपूर : मध्य रेल्वेने गेल्या महिनाभरात विविध प्रकारच्या माल वाहतुकीतून तब्बल ४५७ कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये याच जून महिन्यात ४३४.८४ कोटींची कमाई रेल्वेने केली होती. आतापर्यंतच्या जून महिन्याच्या कमाईचा हा सर्वोच्च आकडा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या जून महिन्यात रेल्वेगाड्यांमधून ४.३२ मिलियन टन वाहतूक करण्यात आली. त्यात कोळशाच्या वाहतूकीतून ३४९.९५ कोटी, आयरन ४१.१२ कोटी, सिमेंट ६.६५ कोटी, स्टील ६८ लाख, डीओसी २.१६ कोटी, साखर ८२ लाख, डोलोमाईट १.७१ कोटी, आयरन स्लॅग ४८ लाख, कंटेनर १५.१९ कोटी आणि मॅगनिजच्या वाहतूकीतून मध्य रेल्वेने ७८ लाख रुपयांची कमाई केली. या शिवाय तिकिट तपासणीतून ३ कोटी, ७५ लाख रुपये प्राप्त केले.
तीन महिन्यात १४०० कोटी
सुरू झालेल्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थात एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत रेल्वेने १३९९.४२ कोटी रुपये कमविले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची १३५.८ कोटींची कमाई
मध्य रेल्वेसोबतच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेनेही जून २०२३ च्या वाहतूकीच्या माध्यमातून कमविलेल्या उत्पन्नाचा आढावा मांडला आहे. त्यानुसार, गेल्या जून महिन्यात दपूम रेल्वेने १.२१ मिलियन टनाची वाहतूक करून १३५ कोटी, ८१ लाखांचे उत्पन्न मिळवले.