नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचा गेल्या निवडणुकीचा इतिहास पाहता भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. एकूण मतदारांपैकी ४० टक्क्यांहून अधिक मतदार हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत तर त्याखालोखाल चंद्रपूरचे १९ टक्के मतदार आहेत. या निवडणुकीत नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांतील मतदार निर्णायक ठरणार आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे अडबाले समर्थकांच्या जीवात जीव आला. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे संघटनेच्या बळावर कामाला लागले तर नागो गाणार हे शिक्षक परिषदेसह भाजपच्या पाठबळावर तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. रिंगणात एकूण २२ उमेदवार आहेत. नागपूर जिल्ह्यात १६ हजार ३२५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ७ हजार ४७१ मतदार आहेत. गाणार व झाडे हे नागपुरातील रहिवासी असून, अडबाले हे चंद्रपूरचे आहेत. नागपुरात गाणार व झाडे वरचढ ठरतील तर अडबाले चंद्रपुरात भरपाई काढतील, असे दावे आता शिक्षक मतदारांकडून केले जात आहेत.
वर्धा, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ४० टक्के मतदान आहे. निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकद या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विजयासाठी लागणारी मते या जिल्ह्यांतूनच खेचावी लागतील, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
असे आहेत मतदार
- नागपूर १६,३२५
- चंद्रपूर ७,४७१
- वर्धा ४,८६२
- गोंदिया ३,८८१
- भंडारा ३,७३०
- गडचिरोली ३,२०८
एकूण - ३९,४७७