महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता
By कमलेश वानखेडे | Published: January 14, 2023 10:57 AM2023-01-14T10:57:01+5:302023-01-14T11:01:44+5:30
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सेनेला ऐनवेळी तिकीट दिल्याने झाडे-अडबोलेंची काँग्रेसवर आगपाखड
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एबी फॉर्म जोडल्याने काँग्रेसच्या समर्थनाच्या आशेवर असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. १५ जानेवारीच्या बैठकीत शिवसेनेने माघार घेतली नाही तर महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.
शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी काँग्रेससोबत असलेली नैसर्गिक युती टिकावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी आपणच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नना पटोले यांनी अद्याप जी ही जागा शिवसेनेसाठी सोडली नसल्याचा दावा केला आहे. असे असताना नाकाडे यांनी अर्जासोबत शिवसेनेचा एबी फॉर्म जोडल्याने आता नाकाडे यांना माघारी घ्यायला लावणे वाटते तेवढे सोपे नाही हे स्पष्ट आहे. असे असले तरी झाडे व अडबाले यांना दोन्ही उमेदवारांना १५ जानेवारी रोजी मुंबईत होत असलेल्या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या बैठकीत शिवसेनेने माघार घेण्याची शक्यता कमीच आहे. तसेच विदर्ब माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक भारती या दोन्ही संघटनादेखील एकमेकांना समर्थन देण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे तिन्ही उमेदवार एकमेकांविरुद्ध दंड थोपटण्याची शक्यता आहे.
ताकदीने लढू व जिंकून दाखवू
‘लोकमत’शी बोलताना राजेंद्र झाडे म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेच्या नेत्यांनी मला शब्द दिला होता. शब्द पाळला तर यापुढेही लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील. मात्र, महाविकास आघाडीचे नाव समोर करीत शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट दिले जात आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यांनी जिंकणाऱ्या उमेदवाराला पाठबळ द्यायला हवे. आम्ही १२ वर्षांपासून फिल्डवर काम करीत आहोत. प्रत्येक तालुक्यात बांधणी झाली आहे. आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढू व जिंकून दाखवू, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेसचे स्थानिक नेते सोबत
सुधाकर अडबाले म्हणाले, काँग्रेसकडून मला नक्कीच समर्थन मिळेल. विविध संस्था व संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. ७५ वर्षांपासून संघटनेचा इतिहास आहे. काँग्रेस विचारसरणीची ही संघटना आहे. आमचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. आजवर सात आमदार एकूण १६ वेळा काँग्रेसच्या पाठबळावरच सभागृहात निवडून गेले आहेत. काँग्रेसचे बरेच नेते व पदाधिकारी माझ्यासाठी मत मागत आहेत. त्यामुळे १६ तारखेपर्यंत काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.