लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधांचा तुटवडा, अद्यावत सोर्इंंचा अभाव, रिक्त पदे, बंद होणारे वॉर्ड यामुळे रुग्णांच्या असंतोषाला आता डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी एका रुग्णाला औषधे व साहित्य नसल्याचे कारण देऊन शस्त्रक्रिया नाकारल्याने त्याने आपला मनस्ताप डॉक्टरासमोर व्यक्त केला. मात्र त्या डॉक्टरने त्याला कोंडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकारामुळे रुग्णालयामध्ये चांगलीच खळबळ उडाली. शेवटी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्या.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. परंतु शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न पडला आहे. रुग्णालात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. ५० टक्के पदे रिक्त आहेत. परिणामी, एक-एक वॉर्ड बंद होत आहेत. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाची देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने ही रुग्णालये आपली सेवा देणे बंद करीत आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने त्यांचा संताप आता समोर येऊ लागला आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला.प्राप्त माहितीनुसार, इंडोरामा कंपनी, बुटीबोरी येथील गजानन मस्के (४०) हा रुग्ण ‘हिप जॉर्इंट रिप्लेसमेंट’साठी विमा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आला. आर्थाेपेडिक सर्जन डॉ. लवंगे यांनी त्याला तपासले. परंतु शस्त्रक्रियेसाठी आवश्यक औषधे व साहित्य नसल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना चौधरी यांना भेटण्यास सांगितले. मस्के व त्याच्या कंपनीचे काही मित्र डॉ. चौधरी यांना भेटण्यास गेले. डॉ. चौधरी यांनी औषधे व साहित्य खरेदीचे अधिकार हाफकिन कंपनीला देण्यात आल्याने त्याची खरेदी करणे शक्य नसल्याचे सांगितले. यावरून वाद झाला. अचानक डॉ. चौधरी यांनी बाहेर येऊन रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना आत कोंडले. सक्करदरा पोलिसांना बोलविले. पोलीस आल्यानंतर नातेवाईक व डॉ. चौधरी यांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे पोलीस निरीक्षकांनी दोघांची समजूत घातली. दोघांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्या. तूर्तास हे प्रकरण निवळले असले तरी रुग्णालयातील सोर्इंच्या अभावाला घेऊन रुग्णांचा रोष वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
आमची स्थिती कोण समजून घेणार
रुग्णालात सोई नसल्याने रुग्णांचा संताप आम्ही समजू शकतो, परंतु आमच्या मर्यादा आहे. या कोण समजून घेणार हा प्रश्न आहे. ‘हिप जॉईंट रिप्लेसमेंट’ला लागणारी औषधे व साहित्यासाठी फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे प्रस्ताव पाठविला परंतु अद्यापही साहित्य मिळालेले नाही.-डॉ. मीना देशमुखवैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय