प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 10:46 AM2022-03-08T10:46:59+5:302022-03-08T11:05:23+5:30

युवक काँग्रेसवर बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा दिसून आला आहे.

Nagpur dominates in the organizational elections of Pradesh Youth Congress | प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

Next
ठळक मुद्देशहर अध्यक्षपदी शीलजरत्न पांडे, जिल्हाध्यक्षपदी मिथिलेश कन्हेरे विजयीशिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, याज्ञवलक्य जिचकार, अनुराग भोयर प्रदेशवर

नागपूर : प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बऱ्याच वर्षांनी प्रदेशवर नागपूरचा दबदबा दिसून आला. गेल्या सहा महिन्यांपासून मैदानात उतरलेले बहुतांश नेतापुत्र निकाल आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी झाले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना पहिल्या क्रमांकाची मते मिळाली. याशिवाय दोन उपाध्यक्ष व तीन महासचिव नागपूरकर युवा नेत्यांनी काबीज केले. नागपूर शहर अध्यक्षपदी शीलजरत्न पांडे व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी मिथिलेश कन्हेरे विजयी झाले आहेत. शीलज पांडे हे काँग्रेस सेवादलचे राष्ट्रीय सल्लागार व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे पुत्र आहेत.

प्रदेश उपाध्यक्ष पदासाठी शब्बीर विद्रोही यांचे पुत्र तनवीर विद्रोही व आकाश गुजर यांची निवड झाली आहे. महासचिव पदासाठी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे यांचे पुत्र केतन, डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य, सुरेश भोयर यांचे पुत्र अनुराग भोयर, पंकज सावरकर, आसिफ शेख, नेहा निकोसे यांनी बाजी मारली.

बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

युवक काँग्रेसवर बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा दिसून आला आहे. आता कुणाल राऊत यांचे प्रदेशाध्यक्षपद जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी अविनाश पांडे, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद या नागपूरकर नेत्यांनी युवक काँग्रेसचे राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. कुणाल राऊत यांनी यापूर्वी दोनदा प्रदेश उपाध्यक्षपद भूषविले आहे. ऑनलाईन मतांची माहिती मिळताच राऊत समर्थकांनी बेझनबाग जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. तर ग्रामीणमध्ये जिल्हा उपाध्यक्ष अनिल राय यांच्यासह केदार समर्थकांनी जल्लोष केला.

ग्रामीणमध्ये केदार गटाचा दबदबा

नागपूर ग्रामीणमध्ये क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या गटाने बाजी मारली. जिल्हाध्यक्षपदी विजयी झालेले मिथिलेश कन्हेरे यांच्यासह सावनेर विधानसभा अध्यक्षपदी राजेश खंगारे (तिसऱ्यांदा), रामटेकमध्ये निखिल पाटील (दुसऱ्यांदा) तर हिंगणा विधानसभा अध्यक्षपदी फिरोज शेख या केदार समर्थकांनी विजयी झेंडा रोवला. उमरेड विधानसभेच्या अध्यक्षपदी गुणवंता मंदारे, काटोलमध्ये विनोद नोकरीया यांनी बाजी मारली. कामठी विधानसभेचा निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला नव्हता.

शहरातील विधानसभा अध्यक्ष

पूर्व नागपूर - भावेश तलमले (३०४४)

पश्चिम नागपूर - जॉन अगस्तीन (२३९०)

उत्तर नागपूर - नीलेश खोब्रागडे (४४७७)

दक्षिण नागपूर - सुशांत लोखंडे (४२८०)

दक्षिण-पश्चिम - अजिंक्य बोडे (२१५५)

मध्य नागपूर - नयन तरवतकर (७०७८)

Web Title: Nagpur dominates in the organizational elections of Pradesh Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.