लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत झालेल्या वादामुळे दोघांनी एका मजूर साथीदाराची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेचा शनिवारी सकाळी खुलासा झाला. विक्की मुन्ना शाहू (वय ३०) असे मृताचे नाव असून तो कळमन्यातील मिनी मातानगरात राहायचा.मजुरी करणाऱ्या शाहूला दारूचे व्यसन होते. त्याच्यासोबत काम करणारे सिकंदर आणि सतीश नामक दोन मजुरांचा शाहूसोबत काही दिवसांपूर्वी मोबाईलवरून वाद झाला होता. शुक्रवारी रात्री शाहू, सिकंदर आणि सतीश हे तिघे पुन्हा सूर्यनगरातील एका ठिकाणी दारू प्यायला बसले. त्यांच्यात पुन्हा मोबाईलवरून वाद झाला. हाणामारीनंतर सिकंदर आणि सतीशने शाहूच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. नंतर त्याला झुडूपात ओढत नेऊन पळून गेले. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास परिसरात शाहूचा मृतदेह पडून दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले. तेथे पोहचलेल्या कळमना पोलिसांनी दारूच्या नशेत शाहू पडला असावा, त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अस तर्क बांधून हा हत्येचा नव्हे तर अपघाताचा प्रकार असल्याचे म्हटले होते. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर कळमना पोलिसांनी मृताचा भाऊ चिंटू शाहू याची तक्रार नोंदवून घेत हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.