नागपूर :नागपूर शहरात अनेक ऐतिहासिक वारसास्थळे आहेत. मात्र अतिक्रमण, बांधकामामुळे वारसास्थळे दृष्टीआड गेलेली आहेत. महाल भागात सुमारे अडीचशे, तिनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक इमारती आणि धार्मिक स्थळे आहेत. केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी हटविण्यात आलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे आता पुरातन रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर व मुरलीधर मंदिर फ्रंटवर आले आहे.
दोन्ही मंदिरे ऐतिहासिक असून, हेरिटेज श्रेणीत मोडतात. ही मंदिरे जवळपास पाऊणेतीनशे वर्षे जुनी असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बाकाबाईचा वाडा अर्थात सध्याचे कोतवाली पोलीस ठाणे हे या मंदिराला लागून आहे. रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर परिसरात महादेवाचे प्राचीन मंदिरही आहे. तसेच येथे आबाजी महाराज यांची समाधी असल्याचे स्थानिक सांगतात. याशिवाय परिसरात शेकडो वर्षे जुनी एक बावडी विहीर आहे. ज्यात गुप्त दरवाजा असल्याचे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिराच्या समोर असलेल्या काळ्या दगडांनी तयार केलेले मुरलीधर मंदिर आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी सुबक असे कोरीव काम करण्यात आले आहे. अनेक मूर्ती दगडात कोरण्यात आल्या आहेत. तसेच केळीबाग मार्गावर महालक्ष्मी मंदिर आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे मंदिरे आता दिसून येत आहेत. या समृद्ध इतिहासाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी आणि या ऐतिहासिक वास्तूंचे योग्य जतन व्हावे, याकरिता मनपा प्रशासन कार्य करीत आहे.
दुकानांमुळे हरवली होती मंदिरे
महाल स्थित कोतवाली पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीला लागून एक रिद्धी-सिद्धी गणेश हे पुरातन मंदिर आहेत. तर मंदिराच्या विरुद्ध दिशेला मुरलीधर हे पुरातन मंदिर आहे. या दोन्ही मंदिराच्या अवती-भोवतीच्या दुकानांमुळे हे मंदिर वेढले जाऊन दिसेनासे झाले होते. भोसलेकालीन मुरलीधर मंदिर, रिद्धी सिद्धी गणेश मंदिर, महादेव मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकर राम मंदिर व जैन मंदिर दुमजली दुकानांच्या विळख्यात हरवले होते.