नागपूर : होय काळी इडली! मऊ-मऊ सफेद इडली चटणीबरोबर खाणं कुणाला आवडणार नाही, पण तुम्ही ऑर्डर केलेल्या प्लेटमध्ये शुभ्र सफेद इडलीऐवजी कुणी काळी इडली सर्व्ह केली तर.. आश्चर्यात पडला ना! होय नागपुरात मिळणारी ही काळी इडली सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतेय. काय आहे ही काळी इडली जाणून घेऊया
दाक्षिणात्य पदार्थ सर्वांनाच आवडतात. इडली, दोसा, उत्तप्पम, वडा, बोंडा नावं घेताच तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही आत्तापर्यंत दाळ-तांदळापासून बनलेल्या पांढऱ्या शुभ्रे इडल्या गरमागरम सांभारसोबत खाल्ल्याच असतील. पण, या इडलीवर नागपुरात भन्नाट एक्सपेरिमेंट करण्यात आलाय. होय, नागपुरातील एका कुमार रेड्डी फूड स्टॉलवर या काळ्या रंगाच्या इडल्या मिळताहेत. सध्या या इडल्यांचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरात कदीम बाग नर्सरीजवळ कुमार रेड्डी यांच्या फूड स्टॉलवर ही इडली मिळतेय. इतकेच नव्हे तर रेड्डी यांच्या स्टॉलवर शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या इडल्या मिळतात. ही चारकोल इडली जिला काळी इडलीही म्हटले जातेय, नारळाचा खोल, संत्र्याची साल, बीट रुटचा पल्प असे पदार्थ वापरून तयार केली जाते. नारळाचा खोल वापरल्यामुळे इतर इडल्यांपेक्षा या इडलीची चव जरा वेगळी आहे. पण, जीभेचे चोचले पुरवायचे तर एक्सपेरिमेंट करना पडता है बॉस.
तर, झालं अस की, कुमार रेड्डी यांना सुरुवातीपासूनच काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा होती. रेड्डी हे मुळचे दाक्षिणात्य असल्यामुळे त्यांनी हौस म्हणून इडलीचे दुकान सुरू करण्याचा निर्धार केला. मात्र, त्यांना काहीतरी हटके करायचे होते. त्यामुळे, त्यांनी पारंपरिक इडलीची चव कायम ठेवत इडलीवर वेगवेगळे प्रयोग सुरू केले आणि ही चारकोल इडली तयार झाली. रेड्डींना नारळाचे आवरण वाळवून, भाजून त्याची भुकटी तयार केली. व या भुकटीचा वापर रेड्डी नंतर इडली तयार करण्यासाठी करायला सुरुवात केली. आज त्यांच्याद्वारे बनवलेली काळी इडली सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.
रेड्डी यांच्या स्टॉलवर पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच या चारकोल इडलीचा आस्वाद घेता येतो. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागपूरकर या इडलीचा आस्वाद घेत असून जरा हटके असलेली ही काळी इडली नागपुरकरांमध्ये सध्या ट्रेंड होत असून कुमार अन्ना इडलीवालेही सध्या जाम चर्चेत आहेत.