लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा बालेकिल्ला राखताना भाजपची मोठी दमछाक झाली. गेल्यावेळी १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या गडाला यावेळी हादरा बसला. नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, काटोल, उमरेड, रामटेक या पाच जागा भाजपने गमावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिममधून एकतर्फी विजय नोंदविला. तर नागपूर दक्षिण व कामठीमध्ये अखेरपर्यंत काट्याची टक्कर होऊन भाजपने बाजी मारली. काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी एकहाती विजय मिळविला. तर रामटेकमध्ये शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी भाजपचे पाणीपत केले. नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आशीष देशमुख यांचा एकतर्फी पराभव केला. मतदारांनी फडणवीस यांच्या विकास कामांना भरभरून पावती दिली. फडणवीस यांनी या मतदारसंघातून हॅट्रीक मारली असून नागपुरातून ते पाचव्यांदा विधानसभेत पोहचले अहेत. नागपूर पूर्वमध्ये भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅट्रीक केली. त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना पराभूत केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पाठबळाचा खोपडे यांना फायदा झाला. नागपूर पश्चिममध्ये तब्बल २० वर्षांनी भाजपचा अस्त तर काँग्रेसचा उदय झाला. येथे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांचा काट्याच्या लढतीत पराभव केला. नागपूर उत्तरमध्ये यावेळी उलटफेर झाला. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना गमावलेली जागा खेचण्यात यश आले. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांचा पराभव केला. येथे गेल्यावेळीप्रमाणे बसपाचा हत्ती धावला नाही. तर वंचित बहुजन आघाडीदेखील लक्षणीय मतांपासून वंचित राहिली. दक्षिण नागपुरात भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून माजी आमदार मोहन मते यांना संधी दिली होती. मते यांना काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी कडवी झुंज दिली. काट्याच्या लढतीत मते यांनी बाजी मारली. भाजपचे बंडखोर सतीश होले व शिवसेनेचे बंडखोर किशोर कुमेरिया या दोन्ही माजी उपमहापौरांनी भाजपची मते खेचल्यामुळे मते यांना विजय मिळविताना दम लागला. काँग्रेसचे बंडखोर प्रमोद मानमोडे विशेष कामगिरी करू शकले नाहीत. नागपूर मध्यमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांनी विजयाची हॅट्रीक मारली. त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांचा पराभव केला. हलबा समाजाच्या एकगठ्ठा मतांनी कुंभारे यांना तारले. तर मुस्लिम समाजाला एकही तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या मुस्लिम मतदारांनी ‘एमआयएम’ला दिलेल्या पसंतीचा काँग्रेसला फटका बसला.काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख विजयी झाले. येथे भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गतवेळी काटोलची जागा भाजपने मिळविली होती. आशिष देशमुख यांनी आमदरकीचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख या मतदार संघात अधिक सक्रीय झाले. जातीय समीकरणाचा सर्वाधिक फायदा देशमुख यांना झाला.सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार यांनी भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना पराभूत केले. पोतदार यांना जातीय समीकरणाचा फटका यांना बसला. कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विकास कामांची पुण्याई कामी आली. सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी भाजपचे सावरकर यांना मागे टाकले होते. शहरी भागात मात्र काँग्रेसला मतदारांनी नाकारत भाजपचा विजय निश्चित केला.उमरेडमध्ये काँग्रेसचे राजू पारवे यांना भाजपचे सुधीर पारवे यांची हॅट्रीक रोखण्यात यश आले. त्यांच्या विजयासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक मतदार संघात तळ ठोकून होते. सुधीर पारवे मितभाषी असले तरी मतदार संघातील रखडलेले प्रकल्प त्यांच्या पराभावाचे मुख्य कारण ठरले.रामटेकच्या गडावर शिवसेना बंडखोर अॅड.आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पाणीपत केले. भाजपचे आ. डी.मल्लीकार्जून रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. हिंगण्यात भाजपचे समीर मेघे यांच्या विकास कामांना मतदारांनी कौल दिला. मेघे यांनी राष्ट्रवादीचे विजयबाबू घोडमारे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीने येथे घोडमारे यांच्या रुपात नवा चेहरा दिला होता. मात्र मेघेंसमोर त्यांचा टिकाव लागला नाही.
असा आहे निकालभाजप : ६काँग्रेस : ०४राष्ट्रवादी : ०१अपक्ष : ०१