उमरेड (नागपूर) : ‘बेरोजगारीमुळे पुढील आयुष्य खूप कठीण वाटत होते, म्हणून मी हा निर्णय घेत आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा आहे’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून उमरेड येथील एका बेरोजगार तरुणाने गळफास लावत आपली जीवनयात्रा संपविली. पवन नरेंद्र ठाकरे (२५, रा. लक्ष्मीनगर, उमरेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने इंजिनियरिंगचे (बीई) शिक्षण पूर्ण केले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आत्महत्येची ही घटना उजेडात आली.
पवनचे वडील नरेंद्र वेकोली येथे कार्यरत आहेत. तो नियमित उशिरापर्यंत अभ्यास करायचा आणि सकाळी उशिराने उठायचा, असाच त्याचा दिनक्रम होता. गुरुवारी रात्री जेवण केल्यानंतर तो आपल्या खोलीत अभ्यासासाठी गेला. खोलीचे दार आतून बंद केले होते. छताच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून पवनने गळफास घेतला.
शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दरवाजावरून कुटुंबीयांनी हाक दिली. तो उठला नाही. नेहमीप्रमाणे झोपला असेल असे कुटुंबीयांना वाटले. पुन्हा दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ आकाश याने दरवाजा ठोठावून आवाज दिला. त्याच्या मोबाईलवर संपर्क केला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय बळावल्याने आकाशने दरवाजाची कडी कापून आत प्रवेश केला, पवन मृतावस्थेत होता. माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. ग्रामीण रुग्णालयात मृतक पवनचे शवविच्छेदन करण्यात आले. पवनच्या अशा टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबीय, मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.
राज्यात केवळ ‘भोंगा’ या विषयावर चौफेर टोलेबाजी आणि रणकंदन सुरू असतानाच बेरोजगारीच्या कारणावरून उमरेडच्या पवन ठाकरे याने केलेली आत्महत्या चिंतनाचा विषय ठरला आहे.