नागपूर : इंजिनीअर असलेल्या सुशिक्षित व्यक्तीला सायबर गुन्हेगाराने ऑनलाइन टास्कमध्ये नफा देण्याचे आमिष दाखवून त्याची १४ लाख ६२ हजार ५०९ रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
आशिष भीमराव पवनीकर (वय ३१, रा. भाग्यश्रीनगर, खरबी रोड) असे फसवणूक झालेल्या इंजिनीअरचे नाव आहे. ते एका खासगी इन्शुरन्स कंपनीत कामाला आहेत. १३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरदरम्यान त्यांना टेलिग्राम आयडीवरून मोबाइलवर मॅसेज आला. सायबर गुन्हेगाराने त्यांना ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास जास्तीत जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखविले. सुरुवातीला आरोपीने त्यांना नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
अधिक रक्कम गुंतविल्यास अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्याकडून १४ लाख ६२ हजार ५०९ रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा दिला नाही. आशिष यांनी रक्कम परत मागितली असता आरोपीने टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी आशिष यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेकानंद औटी यांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, सहकलम ६६ (डी) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.