लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी शुक्रवारी नागपूर ते ईटारसी रेल्वे मार्गची स्थिती कशी आहे, त्याचे निरीक्षण केले. गाड्यांच्या संचालनाच्या दृष्टीने या मार्गात कुठे काही समस्या आहे का, ते तपासण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक सोबत घेऊन डीआरएम यांनी 'लोकोमोटीव्ह' (रेल्वे रुळावर धावणारी छोटी खुली गाडी)मधून पाहणी केली.
अलिकडे रेल्वेचे नेटवर्क अधिक प्रशस्त करण्यावर जोर दिला जात आहे. त्यामुळे अनेक मार्गावर तिसरी आणि चवथी लाईन टाकली जात आहे. अशात जुन्या ज्या लाईन्स आहेत, त्यांच्यात कुठे काही समस्या आहेत का, त्याचीही वेळोवेळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर, डीआरएम अग्रवाल यांनी शुक्रवारी रेल्वे संरक्षण आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके निश्चित करण्यासाठी थर्ड लाईनचा हा दाैरा केला. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा दर्जा कसा आहे ते तपासण्यासाठी ट्रॅक, सिग्नलिंग आणि ऑपरेशनल प्रोटोकॉलच्या विविध पैलूंचे बारकाईने परीक्षण केले.
मरामझिरी रेल्वे स्टेशनला भेटनागपूर ईटारसी रेल्वे मार्गावरील मरामझिरी रेल्वे स्टेशनला भेट दिली या स्टेशनवर माल वाहतूक कशी आहे, तेथे एकूणच सोयी सुविधांची स्थिती कशी आहे आणि तेथील परिचालन क्षमता कशी वाढविता येईल, यावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांचाही आढावा अग्रवाल यांनी यावेळी घेतला.
सारणी पॉवर प्लांटचीही पाहणीअग्रवाल यांनी शुक्रवारी सारणी पॉवर प्लांटला भेट देऊन तेथून फ्लाय ॲश लोड करण्याच्या शक्यतेवार आणि कोळशाच्या वाहतुकीवरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोन्ही बाबींच्या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवता येईल,असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.