लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर महापालिकेची शहर बससेवा ठप्प पडली आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली होती.नागपूर महापालिकेद्वारे शहर बससेवा संचालित करण्यात येत आहे. शहरात दररोज ३५० च्यावर बसेस धावतात. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर, कन्हान, वाडी, चौदा मैल, खापरखेडा, पारडी, नरसाळा, पिपळा असा शहरापासून जवळपास ३० किलोमीटरचा प्रवास करतात. शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसचा प्रवास करतात. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. बससेवेपासून महापालिकेला दररोज १८ ते २० लाखाचा महसूल मिळतो. ही बससेवा जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना तीन हजार ते नऊ हजार दरम्यान वेतन देण्यात येते. या तोकड्या मानधनावर काम करणे अशक्य असल्याने, भारतीय कामगार सेनेच्या निर्देशानुसार ऐन परीक्षेच्या तोंडावर संप पुकारला आहे. बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरने सर्व बसेस डेपोत सोडून पटवर्धन मैदानाजवळ आंदोलन सुरू केले आहे. महापालिका जोपर्यंत १८,३९८ रुपये किमान वेतन देत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र संपामुळे मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात, आयटीआयमध्ये येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना बसच्या संपामुळे सुटी मारावी लागली. काही मुले मित्रांच्या वाहनांवर आली. परत जातांना त्यांना त्रास झाला. शहरातील ‘आपली बस’च्या अनेक थांब्यावर शुकशुकाट दिसला. बसच्या डेपो परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. बाहेरगावाहून आलेले प्रवासी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते. बसच्या संपामुळे आॅटोचालकांनी प्रवासी दर वाढविले होते. कळमेश्वर, वाडी, बुटीबोरीला जाणारे प्रवासी एसटी महामंडळाच्या बसची मोरभवन बसस्थानकावर वाट बघत होते. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेचे दिवस आहेत. अशा वेळी तरी प्रवासी वाहतूक बंद नसावी, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम२४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार महापालिकेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना वेतन मिळावे म्हणून १९ मार्च २०१६ ला अप्पर कामगार आयुक्तांनी पत्र दिले आहे. या पत्रानुसार वंश निमय इन्फ्रा प्रो. मधील सर्व कामगारांना पगार देणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. किमान वेतनासाठी दोन वर्षापासून मनपा प्रशासनासह शासनाला पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु मनपा आयुक्त, महापौर वेतन द्यायला तयार नाही. आम्ही आयुक्तांना संपाचे पत्रही दिले आहे परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही. त्यामुळे किमान वेतनाची मागणी पूर्ण होईपर्यंत संप कायम राहणार आहे.बंडू तळवेकर, जिल्हा संघटक, भारतीय कामगार संघटना बस बंद असल्याची माहिती नव्हतीकमाल टॉकीज, इंदोरा परिसरात राहणारा हिमांशू मसराम शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेतो. मंगळवारी सकाळी बसस्थानकावर आल्यावर बस बंद असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे मित्राच्या गाडीवर तो आयटीआयमध्ये आला. आता मित्र निघून गेल्यामुळे आॅटोशिवाय पर्याय नाही. बस बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुट्टी मारल्याचे तो म्हणाला. पर्याय नाही पायीच जावे लागेलकुकडे लेआऊट येथील आशिष चक्रव्यास याला काही कामासाठी आकाशवाणी चौकात जायचे होते. तो सीताबर्डीपर्यंत आॅटोने आला. बराच वेळ त्याने बसची वाट बघितली. बस काही आली नाही. त्यामुळे पायी जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे तो म्हणाला.परीक्षेच्या काळात संप नकोकळमेश्वरला राहणारी कविता बुरडकर ही इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये शिक्षण घेते. सकाळी ती मैत्रिणीबरोबर कॉलेजला आली. आपली बस बंद असल्यामुळे ती एसटी महामंडळाच्या बसची प्रतीक्षा मोरभवन बसस्थानकावर करीत होती. बस बंद असल्यामुळे तिला घरी जाण्यास उशीर होत होता. सध्या शाळा महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे वातावरण आहे. अशावेळी प्रवासी सेवेचा संप नको, अशी भावना तिने व्यक्त केली. वेळ आणि अगाऊचा पैसाही खर्च होतोयकळमेश्वरमध्ये राहणाऱ्या माधुरी चौधरीसुद्धा बसच्या प्रतीक्षेत त्रस्त झाल्या होत्या. माहेरून त्या आपल्या गावी जात होता. सामान आणि सोबत लहान मुलांना घेऊन मोरभवन बसस्थानकात एसटी बसची वाट बघत होत्या. बसच्या संपामुळे वेळ आणि अगाऊचा पैसा खर्च होत असल्याचे त्या म्हणाल्या.
नागपुरात ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘आपली बस’ सुटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 10:07 PM
बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर महापालिकेची शहर बससेवा ठप्प पडली आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली होती.
ठळक मुद्देकिमान वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा संप : प्रवासी त्रस्त