लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रखवालदार म्हणून ठेवलेल्याने संधी मिळताच गोदामातील गॅस सिलिंडर चोरून विकण्याचा सपाटा लावला. तब्बल ६३ गॅस सिलिंडर चोरणाऱ्या आरोपी रखवालदाराचे अखेर बिंग फुटले. विश्वनाथ भोजराज वरखडे (वय ३५) असे त्याचे नाव असून तो रामटेक तालुक्यातील शीतलवाडी येथील रहिवासी आहे.कुंपणानेच शेत खावे तशी ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. कोराडी नाक्याजवळ अंजूमन एचपीचे गॅस एजन्सीचे गोदाम आहे. तेथे वरखडेला रखवालदार म्हणून ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून गोदामातील सिलिंडर कमी होत असल्याचे व्यवस्थापक नागेश सुरेशराव गौरीहर यांच्या लक्षात आले. चार वर्षांपासून रखवालदारी करणाºया वरखडेवर त्यांचा संशय नव्हता. मात्र, सिलिंडर चोरीला गेल्याचेही स्पष्ट झाल्याने त्यांनी २० मार्चला कोराडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा गोदामाचा रखवालदार म्हणून कार्यरत असलेल्या वरखडेनेच ६३ गॅस सिलिंडर चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याचा पीसीआर मिळवला. त्याने सिलिंडर चोरीची कबुली दिली. चोरलेल्या सिलिंडर पैकी १७ पोलिसांनी जप्त केले.पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोराडीचे ठाणेदार सतीश गोराडे, उपनिरीक्षक विशांत नांदगाये,हवलदार इसराईल शरिफ, सुभाष दुपारे, सुरेश मिश्रा, रवी इवनाते यांनी ही कारवाई केली.
नागपुरात कुंपणानेच शेत खाल्ले :रखवालदाराकडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:01 AM
रखवालदार म्हणून ठेवलेल्याने संधी मिळताच गोदामातील गॅस सिलिंडर चोरून विकण्याचा सपाटा लावला. तब्बल ६३ गॅस सिलिंडर चोरणाऱ्या आरोपी रखवालदाराचे अखेर बिंग फुटले.
ठळक मुद्दे६३ गॅस सिलिंडर लंपास