लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई, यासाठी केंद्राने पॅकेज घोषित करावे, सोयाबीनचा भाव किमान प्रति क्विंटल ६ हजार रुपये स्थिर राहण्यासाठी केंद्राने धोरण आखावे, सीसीआयची तालुकानिहाय कापूस खरेदी केंद्रे दिवाळीपूर्वी चालू करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चेकरी कूच करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.
संविधान चौकात सकाळी ८ वाजताच्या सुमारास पणत्या पेटवून आंदोलनकर्त्यांनी आंदोलनात्मक दिवाळीचा आरंभ केला. चिवडा, लाडू, ठेचा-भाकरी व आकाशदिवे घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. मागण्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच करीत असताना पोलिसांनी अडविले. कार्यकर्ते आग्रही होते. पोलिसांच्या विरोधामुळे वातावरण काही काळ तापले. आंदोलनात राणा चंदन, अमित अढाऊ, ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, दयाल राऊत, रवी पडोळे, प्रवीण मोहोळ, अंकुश कडू, बालाजी मोरे, अमोल राऊत, पवन देशमुख, शे. रफीक शे. करीम, नितीन राजपूत, प्रदीप शेळके, सय्यद वसीम, राजेश गवई, दत्ता पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अटकेची कारवाई अन् कार्यकर्त्यांचे राष्ट्रगीत
आंदोलकांनी गनिमीकावा वापरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटकेची सुरुवात करताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी अचानक राष्ट्रगीत चालू केले. यामुळे पोलिसांनाही सावधानच्या स्थितीत उभे राहून काही काळ अटकेसाठी थांबावे लागले. मात्र राष्ट्रगीत संपताच आंदोलकांना कसलीही संधी न देता पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने डांबून ताब्यात घेतले.
ना. नितीन गडकरी यांच्या शब्दाला केंद्रात वजन असल्याने उपराजधानीत हे आंदोलन केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारलाही मते दिली आहेत. त्यामुळे या सरकारने महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय आहे.
- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना