नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:08 PM2024-10-16T23:08:33+5:302024-10-16T23:10:33+5:30

Nagpur Crime News: आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्याच दिवशी नागपुरातील चंद्रमणी नगरात खळबळ घटना घडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

Nagpur: Fatal attack on Congress office bearer saying 'Your politics is over' | नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

-योगेश पांडे,नागपूर
विधानसभा निवडणूक जाहीर होताच जागोजागी पोलिसांनी गस्त वाढविली असतानाच आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी नागपुरात काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून ‘तुझे राजकारण संपले’ असे म्हणत दोन आरोपींनी त्याच्यावर घरासमोरच हल्ला केला. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुहास नानवटकर (३८) असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते मागील एका वर्षापासून चंद्रमणीनगरात त्यांच्या सासुरवाडीत राहत आहेत.

कोणी केला जीवघेणा हल्ला?

आरोपी लोकेश सुरेश गयाल (२४) व कार्तिक सूरज बालगुहर (२३) हे दोघेही त्याच परिसरात राहतात. नानवटकर यांच्या सासुरवाडीच्या समोरील घरात आरोपींचे नेहमीच येणे-जाणे होते. आरोपी मंगळवारी त्यांच्या घराजवळ आले. 

रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर नानवटकर हे त्यांच्या सासूशी बोलत घराबाहेरच उभे होते. दोन्ही आरोपी त्यांच्या पाठीमागून आले व आता तुझे राजकारण संपले असे म्हणत शिवीगाळ करू लागले. त्यांनी नानवटकर यांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यावर अचानक केला हल्ला 

अचानक लोकेशने वीटेने नानवटकर यांच्या उजव्या कानाजवळ प्रहार केला. यामुळे ते खाली पडले व कान रक्तबंबाळ झाला. त्याही अवस्थेत त्यांनी पत्नीसह अजनी पोलिस ठाणे गाठले व पोलिसांनी त्यांना मेडिकल इस्पितळात नेले. 

बीट मार्शल्सने घटनास्थळी पोहोचत दोन्ही आरोपींना अटक केली. सुहास यांची पत्नी तृप्ती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. कार्तिकविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत, तर लोकेशविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

हल्ल्यामागे राजकीय कारण नाही

नानवटकर यांनी दोन तीन वेळा त्यांना काही कारणावरून रागावले होते. त्याचा राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. 

आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यावर पोलिसांकडून गस्त वाढणे अपेक्षित होते. मात्र अजनी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारांवरदेखील वचक राहिलेला नाही. नवीन ठाणेदारांकडूनदेखील हव्या त्या प्रमाणात नियोजन होत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Nagpur: Fatal attack on Congress office bearer saying 'Your politics is over'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.