बहारदार उद्घाटन सोहळा : भरगच्च उपस्थिती नागपूर : पावसाच्या सरी, मान्यवरांची उपस्थिती, मोहित चौहानचे हृदयस्पर्शी सूर अन् नागपूरकर रसिकांच्या उदंड उत्साहात रविवारी ‘नागपूर महोत्सवाचा’ थाटात प्रारंभ झाला. पावसाच्या साक्षीने मान्यवरांनी दीपप्रज्वलित केला अन् एकाएकी आलेला पाऊस आशीर्वाद देऊन निघून गेला. पुढे नागपूर महोत्सवाची रंगत आणखीनच चढत गेली आणि टाळ्यांचा पाऊस अखंड कोसळत राहिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. विकास कुंभारे, आ. नागो गाणार, आ. मिलिंद माने, आ. आशिष देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या महोत्सवाचे संयोजन लोकमत समूहाने केले आहे. (विशेष पान २ वर)राज्य सरकारचा दरवर्षी महोत्सवात सहभाग : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिकेतर्फे नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने एक मोठे पर्व आयोजित केले जात आहे. या महोत्सवासाठी महापौरांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली होती. ती मान्य करीत राज्य सरकार महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून या महोत्सवात सहभागी झाले आहे. यापुढे दरवर्षी राज्यसरकार या महोत्सवात सहभागी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरची संस्कृती प्रदर्शित होत आहे. स्थानिक कलावंतांना वाव मिळतो आहे. सोबतच जागतिक पातळीवर असलेल्या प्रतिभा नागपूरकरांना पहावयास मिळत असल्याचे सांगून त्यांनी या आयोजनासाठी महापालिकेला शुभेच्छा दिल्या. गडकरींच्या शुभेच्छा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. चारही दिवस जनता या महोत्सवाला प्रतिसाद देईल, पाऊसही सहकार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत या महोत्सवाच्या आयोजनासाठी त्यांनी महापौर व चमूला शुभेच्छा दिल्या.
पावसाच्या सरीत रंगला नागपूर महोत्सव
By admin | Published: February 29, 2016 2:35 AM