देवेंद्र फडणवीसांनी हात पकडून ओढलेल्या प्रविण चौधरींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:04 AM2023-09-26T11:04:58+5:302023-09-26T11:05:29+5:30
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांनी नेमकं काय घडलं ते माध्यमांना सांगितले
नागपूर- मुसळधार पावसामुळे शहरात आलेल्या पूर परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यात विरोधकांकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यात देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीचा हात पकडून खेचताना दिसत होते. हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं फडणवीसांना जोरदार टीका केली. त्यावर भाजपानेही खुलासा करत काँग्रेसला टोला लगावला होता. आता या व्हिडिओतील व्यक्ती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी ज्या व्यक्तीचा हात पकडून त्याला ओढले त्यांचे नाव प्रविण चौधरी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांनी नेमकं काय घडलं ते माध्यमांना सांगितले. प्रविण चौधरी म्हणाले की, व्हिडिओ कुणी ट्विट केला त्यावर बोलायचे नाही. त्यादिवशी देवेंद्र फडणवीस आमच्या इथं पाहणीला आले होते. आमची इच्छा होती ती साहेबांनी पाहणी करावी. परंतु त्यांना भरपूर ठिकाणी पाहणीला जायचे होते. प्रोटोकॉलनुसार ते निघून जात होते. इथं २-३ घरे बघितली पाहिजे असं आम्हाला वाटत होते. तेव्हा ते निघून जाताना आम्ही अडवलं. तुम्ही आमच्या घरी पाहणी केलीच पाहिजे असा आग्रह आमचा होता असं ते म्हणाले.
त्याचसोबत देवेंद्र फडणवीस याच भागात नगरसेवक होते. त्यामुळे जुनी ओळख होती. साहेब निघून जात होते, त्यांचे सुरक्षा रक्षक आम्हाला अडवत होते. मी मागे होतो तेव्हा माझा हात धरून ओढला आणि चल रे बाबा तुझ्याही घरी येतो असं म्हटलं. त्यांनी मला ओढण्याचे दुसरा हेतू नव्हता. पण काही लोकांनी हा व्हिडिओ काढला, ज्यात फडणवीसांनी मला धक्का दिला, ओढले असं म्हटलं. व्हिडिओत तसं दिसतंय, परंतु असे काही नाही. त्यानंतर ते २-३ घरात पाहणी करून गेले. आम्हाला आश्वासन दिले आहे असंही प्रविण चौधरी यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या… https://t.co/mIFvOjmyxipic.twitter.com/WFZVgcuLu0
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 24, 2023
दरम्यान, व्हिडिओत सत्यता नाही, आम्हाला माहितीही नाही व्हिडिओ व्हायरल झाला, संध्याकाळी मला फोन आला होता. व्हिडिओ व्हायरल झालाय. परंतु काहीच सत्य नव्हते. त्यावेळी इतकी गर्दी होती. व्हिडिओत दिसतंय परंतु सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून मला ओढणे गरजेचे होते. व्हिडिओ कुणी ट्विट केला, काय बोलले यावर मी बोलणार नाही. परंतु व्हिडिओत जे होते ते सत्य नव्हते असंही चौधरींनी खुलासा केला.