ठळक मुद्दे६० विद्यार्थी शाळेत अडकले शेकडो वस्त्यात पाणी साचले अनेकजण छतावर अडकून
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह परिसरात शुक्रवारी पहाटेपासून मेघ गर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० ते २.३० पर्यत शहरात २६३.०५ मि.मी. पाऊ स झाला. शहरातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने लगतच्या वस्त्यात पाणी शिरले. दोनशेहून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस्त्यावर पाणी तुंबले. पोहरा नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वर्धा मार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवण्यात आली. या मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पोहरा नदीच्या पुरामुळे पिंपळा फाटा, बहादुरा, नरसाळा भागातील अनेक घरे पाण्याखाली आली. शेकडो नागरिक अडकून पडले. जीव वाचविण्यासाठी अनेकजण घराच्या छतावर अडकले. हुडके श्वर येथील आदर्श शाळेत ६० विद्यार्थी अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अडकून पडलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना दोर व बोटीच्या साह्याने बाहेर काढले. शहरातील ३५०० सीसीटीव्हीच्या माध्यमातून महापालिकेच्या कंट्रोलरुमचा वॉच असल्याने मदत कार्याला मदत झाली. शहर पाण्यात असतानाही सुदैवाने यात जिवित हाणी झाली नाही.शहरातील पिंपळा फाटा, बेसा,बेलतरोडी, भामटीरोड, हुडकेश्वर, जयताळा, कमळना गाव, बहादुरा, हावरपेठ, सोमलवाडा, सुदर्शननगर, शांतीनगर, शिवशक्ती ले-आऊ ट, विधानभवन परिसर, दिघोरी, नवजीवन कॉलनी, सोनेगाव, सुभाषनगर, रमा नगर, एन.आय.टी. ले-आऊ ट, मानोवाडा रोड, बेसा पावर हाऊ स, गोपालनगर, नरेंद्रनगर, गंजीपेठ, नंदनवन, सक्करदरा, लकडगंज, रामेश्वरी, राजीवनगर झोपडपट्टी, उदयनगर रिंगरोड, ओमकार नगर, एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट हॉटेलच्या मागील परिसर, बुटीबोरी येथील टायर कंपनीचा परिसर, हिंगणा रोड, उंटखाना मेडिकल रोड, काचीपुरा रामदासपेठ, सीताबर्डी, त्रिमूर्ती नगर, प्रतापनगर, सुयोग नगर,महाराजबाग ते व्हेरायटी चौक, छापरु नगर, घोगली, आकाशवाणी चौक आदी भागात पाणी साचले होेते.घरात पाणी साचल्याने घरातील किमती वस्तू व धान्याचे नुकसान झाले. पाण्यात बुडाल्याने वाहनांचे नुकसान झाले. शहरात सिमेंट रोडची कामे करताना ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांची उंची जास्त असल्याने पाणी थेट बाजुच्या वस्त्यांमधील घरांमध्ये शिरले. यात काचीपुरा, अंबाझरी, पांढराबोडी, कळमना , उदयनगर या परिसरांचा समावेश आहे. तसेच रिंग रोडवरील काही भागात तर रस्त्यांवर पाणी साचल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्पच होती. यात प्रामुख्याने छत्रपती चौक ते आॅरेंज सिटी चौक या मागार्चा समावेश आहे. या मार्गावरील एका बाजुला सध्या सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने चांगलेच पाणी साचले होते. तसेच शंकरनगर चौकातील वाहतुकसुद्धा काही काळासाठी बंद झाली आहे.चौक व वस्त्यातील २७ ठिकाणी पाणी साचलेसुरू असलेली सिमेंट रोडची कामे व बुजलेल्या पावसाळी नाल्या यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याला मार्ग नव्हता. यामुळे शहरातील तब्बल २७ चौकात पाणी साचले होते. यात महाराजबाग ते व्हेरायटी चौक दरम्यानचा मार्ग, रवि नगर ते लॉ कॉलेज चौक, नरेंद्रनगर पुलाखाली, हॉटेल प्राईड ते विमानतळ, झाशी राणी चौक, अशोक चौक, नैवद्यम हॉल जवळ, पांढराबोडी, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, तिरपुडे कॉलेज सदर पोलीस स्टेशनसमोर, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, वर्धा ते नागपूर मार्गावरील क र्वेनगर पुलावरुन पाणी, आयटी पार्क, मारुती शोरूम चौक, पाच नंबर नाका पारडी, तात्या टोपनर, सावरकरनगर, सोमलावाडा ते मनिषनगर, बजाजनगर ते शंकरनगर, काचीपुरा चौक ते बजाजनगर, नंदनवन पोलीस क्वॉर्टर, राणाप्रताप पोलीस स्टेशन, शंकरनगर चौक ते गोकूळपेठ, चत्रपतीचौक ते सावरकर नगर चौक, पडोळे चौक, टि.बी.वॉर्ड ते पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ आदी ठिकाणी पाणी साचल्याची माहिती महापालिकेतील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.वर्धा मार्ग झाला ‘जाम’वर्धा मार्गावर ‘मेट्रो’चे काम सुरू असून विमानतळाजवळील चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या चौकाजवळ सुमारे चार फूट पाणी साचले होते व त्यामुळे येथील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. दुसरीकडे चिंचभवन येथील नालादेखील ‘ओव्हरफ्लो’ झाला होता. त्यामुळे खापरीहून येणाऱ्या वाहतुकीलादेखील फटका बसला. वर्धा मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. तेथील विद्यार्थी, शिक्षक हे बराच वेळ वाहतुकीच्या कोंडीत अडकले होते. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतच थांबवून घेतले होते.‘पॉश’ वस्त्यांतील घरांमध्ये शिरले पाणीपश्चिम नागपुरातील ‘आरपीटीएस’जवळील परिसर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, गोपालनगर, प्रतापनगर, रिंगरोड, चुनाभट्टी येथे सिमेंट रोडचे काम झाले असून रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी घरांमध्ये शिरले होते. शिवाय पश्चिम नागपुरातील अनेक डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दिसून आले. सिव्हील लाईन भागातही अनेक घरात पाणी साचले होते.प्रशासनाची कुंभकर्णी झोपगोपालनगर, प्रतापनगर परिसरातील नगरसेवक व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचरा साचून राहतो. शिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्यामुळे रेती, गिट्टी रस्त्यांवरच पडून असते. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील कुठलीही कार्यवाही झाली नाही. पावसामुळे हा कचरा आणि रेती-गिट्टी वाहून आल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.नागपुरात विक्रमी पाऊससकाळी ८.३० वाजल्यापासून अवघ्या सहा तासांमध्ये नागपुरात २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली. २१ जुलै १९९४ रोजी २४ तासांत ३०४.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. या तुलनेत सहा तासांमध्ये झालेला पाऊस हा एक विक्रमच आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिलागटारे तुंबली, घरांमध्ये स्वच्छतागृहातून पाणीगोपालनगर परिसरातील अनेक ठिकाणी तर गटारे तुंबली होती व गटारांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. जुगलकिशोर ले-आऊट परिसरासह काही ठिकाणी गटार लाईनदेखील ‘चोक’ झाल्यामुळे घरांच्या स्वच्छतागृहातून घाणपाणी बाहेर पडत होते, अशी तक्रार नागरिकांनी केली.टेकडी रोडवरही साचले पाणीनागपूर रेल्वेस्थानकावरून मानस चौकाकडे येणाºया रस्त्यावर पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यातून दुचाकी काढण्याची कसरत नागरिकांना करावी लागत होती. अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या या साचलेल्या पावसात बंद पडल्यामुळे त्यांची चांगलीच गैरसोय झाली. एखाद्या चारचाकी वाहनचालकाने जोरात गाडी नेल्यास या रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रवाशांना ओले होण्याची पाळी आली.मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जापावसाळ्यातील अतिवृष्टीची शक्यता विचारात घेता शहरात पाणी साचणार नाही, वाहतूक ठप्प पडणार नाही. यासाठी महापालिके ची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला जात होता. महापौर, आयुक्तांसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तयारीचा आढावा घेण्यात आला. शहरातील नदी , नाले, गटार व पावसाळी नाल्यांची स्वच्छता करण्याचे वेळोवेळी निर्देश देण्यात आले. मात्र प्रशासनाचा दावा फोल ठरला. सिमेंट रस्त्यांची कामे, तुंबलेली गटारे व पावसाळी नाल्या यामुळे पावसाचे पाणी तुंबल्याने शहराच्या सर्वच भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. शहरातील गटारे व नाल्याची सफाई झाली नसल्याबाबत ‘लोकमत’ ने आधिच वृत्त प्रकाशित केले होते. परंतु त्यानतंरही प्रशासन जागे झाले नाही. यामुळे अनेक वस्त्यात पाणी साचले. निर्माण झालेल्या परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केल्या.