वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमधील एअर इंडिया एमआरओमध्ये बोर्इंग-७३७ विमानाच्या परिपूर्ण देखभाल व दुरुस्तीला मेपासून सुरुवात होणार आहे. यासाठी एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस कंपनीने प्रस्ताव सादर केला असून, पुढच्या आठवड्यात डीजीसीए (डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन)ची चमू आॅडिट करण्यासाठी नागपुरात येण्याची शक्यता आहे.डीजीसीएचे आॅडिट झाल्यानंतर नागपूरमध्ये बोर्इंग-७३७ विमानाच्या देखभाल व दुरुस्तीला मंजुरी दिली जाईल. एआयईएसएलमधील सूत्रांनुसार, ही मंजुरी विमानाच्या पूर्ण वयापर्यंत दिली जाईल. या विमानाचे वय २० वर्षे मानले जाते. स्पाईसजेटसोबत झालेल्या करारानंतर एआयआयएसएल आता डी चेकची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. आतापर्यंत एमआरओकडे सी-२ चेकपर्यंतचीच मंजुरी आहे. याअंतर्गत आॅगस्ट-२०१७ मध्ये स्पाईसजेटच्या केवळ एका विमानाची देखभाल करण्यात आली होती. एमआरओमध्ये सध्या बोर्इंग ७७७ विमानाची परिपूर्ण देखभाल व दुरुस्ती केली जाते. या ठिकाणी दर महिन्यात एक बोर्इंग-७७७ विमान देखभालीसाठी आणले जाते. ७३७ विमानाकरिता केवळ सी-चेकपर्यंतचीच व्यवस्था आहे. एआयआयएसएल आवश्यक उपकरणे व यंत्रासोबत या विमानाची परिपूर्ण देखभाल सुरू करण्याच्या तयारीत आहे.
एअरबस-३२० करिता प्रतीक्षाएअरबस-३२० विमानाची देखभाल व दुरुस्तीची परवानगी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बोर्इंग-७३७ विमानाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर यासाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
रोजगार वाढेलएमआरओमध्ये सध्या ७५ इंजिनियरिंग कर्मचारी व १२५ नॉन इंजिनियरिंग कर्मचारी आहेत. बोर्इंग-७३७ विमानाच्या परिपूर्ण देखभालीची मंजुरी मिळाल्यानंतर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.