बुटीबाेरी (नागपूर) : गणेशपूर (ता. नागपूर ग्रामीण) येथील दारू दुकानातील लुटमार प्रकरणात बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलिसांच्या पथकाने दाेघांना रुईखैरी शिवारात रविवारी (दि. १६) मध्यरात्री अटक केली. त्यांच्याकडून राेख रक्कम, शस्त्र, माेटारसायकल, असा एकूण ५८,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांनी दुकानातून ६० हजार रुपये राेख लुटून नेले हाेते, अशी माहिती ठाणेदार भीमाजी पाटील यांनी दिली.
कुलदीपसिंग लखनसिंग बावरी (२७, रा. रुईखैरी, ता. नागपूर ग्रामीण) व विशाल ऊर्फ बाल्या सुभाष तुमाने (२५, रा. वेगाव, ता. माेरगाव, जिल्हा यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी लुटारूंची नावे असून, दाेघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. अरविंद जयस्वाल यांचे गणेशपूर येथे देशी दारूचे दुकान आहे. शनिवारी (दि. १५) रात्री १०:३० वाजताच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. मनीष चिंतामन गाेहणे (४१, रा. प्रभाग क्रमांक ६, बुटीबाेरी, ता. नागपूर ग्रामीण) यांनी दारू विक्रीतून आलेले ६० हजार रुपये बॅगेत ठेवून ते माेटारसायकलने बुटीबाेरीला यायला निघाले. त्यातच मागून माेटारसायकलने आलेल्या अनोळखी तिघांनी त्यांना वाटेत अडविले.
त्यांनी मनीष गाेहणे यांच्या माेटारसायकलची चाबी काढून घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. शिवाय, त्यांच्याकडील रकमेची पिशवी हिसकावून घेत पळून गेले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी मनीष चिंतामन गाेहणे (४१, रा. प्रभाग क्रमांक-६, बुटीबाेरी, ता. नागपूर ग्रामीण) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले. त्यातच पाेलिसांनी यातील दाेघांना अटक केली. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक राकेश साखरकर, उपनिरीक्षक जगदीश पालीवाल, असलम नाैरंगाबादे, नारायण भाेयर, आशिष टेकाम, विनायक सातव, मनीष जुमडे, राकेश तालेवार, आशिष कछवाह, पंकज ढोके, रमेश काकड यांच्या पथकाने केली.
तिसऱ्या आराेपीचा शाेध सुरू
बुटीबाेरी पाेलिसांचे पथक रविवारी मध्यरात्री बुटीबाेरी-वर्धा राेडवर गस्तीवर हाेते. त्यांना कुलदीपसिंग व विशाल वर्धा राेडवरील रुईखैरी वाय पाॅइंटजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आले. या पथकाने दाेघांनाही शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्यांनी गणेशपूर येथील लूटमार प्रकरणाची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्याकडून ४८,५८० रुपये, १० हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची माेटारसायकल आणि १०० रुपयांची कट्यार, असा एकूण ५८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील फरार तिसऱ्या आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे ठाणेदार भीमाजी पाटील यांनी सांगितले.