नागपूर : बिहारकडून नागपूरकडे येणाऱ्या रक्सोल सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून तीन आठवड्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाली. पोलिसांकडे तक्रार देऊनही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पारडी परिसरातील एक व्यक्ती त्यांच्या पत्नी आणि चार मुला-मुलींसह २३ एप्रिलला बिहारमध्ये नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. २४ मे रोजी ते सर्व मुज्जफरनगरहून रक्सोल -सिकंदराबाद रेल्वेगाडीत नागपूरला येण्यासाठी बसले. २६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून तक्रारदार पिता, त्यांची पत्नी तसेच अन्य तीन मुले खाली उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही त्यांची मोठी मुलगी (वय १७ वर्षे, ९ महिने) डब्यातून खाली आलीच नाही. त्यामुळे वडिलांनी पुन्हा डब्यात जाऊन पाहणी केली. बरीच शोधाशोध केल्यानंतरही मुलगी गाडीत आढळली नाही. दरम्यान, वेळ झाल्यानंतर गाडी पुढे निघून गेली.
एक तासापूर्वीच झाली गाडीतून गायब
तब्बल दोन आठवडे मुलीची वाट बघितल्यानंतर अखेर पित्याने १० जूनला रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. उशिरा तक्रार नोंदविण्याचे कारण सांगतानाच पीडित पित्याने नागपूर रेल्वे स्थानक येण्याच्या एका तासापूर्वीच मुलगी डब्यातून गायब झाली होती, असेही सांगितले. पोलिसांनी या संबंधाने चाैकशी केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलीचा पत्ता लागत नसल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी १६ जूनला बेपत्ता मुलीच्या वर्णनासह प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. तिचा पत्ता माहीत असल्यास नागपूर रेल्वे पोलीस किंवा जवळच्या कोणत्याही पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.