लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. गुरुवारी रात्री ७.३० ते ७.४५ च्या सुमारास छत्रपती चौकाजवळ ही संतापजनक घटना घडली.श्रीकांत देवाजी भुजाडे (वय ३३) असे या गुंड आॅटोचालकाचे नाव आहे. तो अजनी चौकात राहतो. तक्रारदार तरुणी नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला आहे. गुरुवारी रात्री तिचा मोबाईल गहाळ झाला. त्यामुळे तिच्या मित्रासोबत गुरुवारी रात्री छत्रपती चौकाजवळच्या बसथांब्यावर ती उभी होती. तिला धंतोली पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याची तक्रार द्यायला जायचे होते. त्यामुळे ती बर्डीकडे जाणाऱ्या वाहनाची वाट बघत उभी होती. तेवढ्यात आरोपी आॅटो (एमएच ४९/ ई २३७६)चा चालक भुजाडे त्याच्या एका साथीदारासह तेथे आला. त्याने तरुणीला अश्लील हातवारे करून आॅटोत बसण्यास सांगितले. तिने नकार दिला असता आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीच्या मित्राने आरोपी भुजाडेला विरोध केला. त्यावरून आरोपी भुजाडे आणि त्याच्या साथीदाराने तरुणीच्या मित्राला मारहाण केली. तरुणीला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या संतापजनक प्रकरणामुळे बसथांब्यावर तणाव निर्माण झाला. त्यानंतर आरोपी आॅटोचालक भुजाडे आणि त्याचा साथीदार पळून गेला. या प्रकरणाची तक्रार पीडित तरुणीने धंतोली ठाण्यात नोंदवली.नेहमीचीच गुंडगिरीपोलिसांनी आरोपी भुजाडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले. त्यांचा धंतोली पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे आरोपी आॅटोचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. रात्रीच्या वेळी महिला-मुलींना बघून अनेक आॅटोचालक त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करतात. सोबतच्या व्यक्तीने विरोध केल्यास त्याला मारहाण करणे, अपमानीत करण्याचे प्रकार घडतात. सीताबर्डीत काही दिवसांपूर्वी आॅटोचालकांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
नागपुरात बसथांब्यावर तरुणीचा विनयभंग, मित्रालाही मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 19:59 IST
बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली.
नागपुरात बसथांब्यावर तरुणीचा विनयभंग, मित्रालाही मारहाण
ठळक मुद्दे छत्रपती चौकात आॅटोचालकाची गुंडगिरी