- मोरेश्वर मानापुरेनागपूर - नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे सोने तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या एक प्रवाशाला अटक करून त्याच्याकडून ३४ लाख रुपये किमतीचे ५४९ ग्रॅम सोने जप्त केले. हे सोने पेस्ट स्वरूपात होते. ही कारवाई केंद्रीय सीमाशुल्क विभागाने केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर सीमाशुल्क विभागाचे एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) आणि एअर कस्टम्स युनिटच्या (एसीयू) सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकाच्या नेतृत्त्वात सहाय्यक आयुक्त व्ही. सुरेश बाबू आणि अंजुम तडवी यांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला.
प्रवाशांच्या आधारे प्रोफाइलिंग अधिकाऱ्यांनी २५ जानेवारीला पहाटे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न रोखला. भारतीय पासपोर्टधारक आणि केरळचा रहिवाशी शारजाहून नागपूरला कतार एअरवेजच्या क्यूआर-५९० या विमानाने प्रवास करीत होता. पेस्ट स्वरूपात सोन्याची तस्करी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याने परिधान केलेल्या आतील पोशाखात पेस्ट स्वरूपातील सोने लपवून ठेवले होते. ते सोने त्याच्याकडून जप्त करण्यात आले.
केरळमधील रहिवासी असलेल्या या प्रवाशाने पहिल्यांदाच नागपुरात प्रवास करून सीमा शुल्क चुकविण्याचा प्रयत्न केला. तथापि, नागपूर विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या सतर्क आणि दक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेत त्याच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. पुढील प्रक्रियेनंतर वरील सोने जप्त केले. अधीक्षक प्रकाश कापसे आणि सुधाकर बारापात्रे, निरीक्षक कृष्णकांत धाकर, सुभम पंथी कोरी आणि हवालदार अनुराग परीकर हे पथकात होते. सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये नागपूर कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.