नागपूर : कोरोनामुळे बंद करण्यात आलेली नागपूर-गोंदिया मेमू दैनिक प्रवासी गाडी पूर्ववत केली जाईल, अशी हमी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत नागपूर-गोंदिया मेमू व कामठी स्थानकावर थांबा देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. खा. तुमाने यांच्या प्रयत्नाने कामठीतून गोंदिया, डोंगरगढ, दुर्ग, रायपूर व छत्तीसगढकडे जाणाऱ्या प्रवासी, व्यापारी, भाविकांची मोठी सोय होणार आहे.
रेल्वे मंत्र्यांशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना खा. तुमाने म्हणाले की, कोरोना महामारीमुळे रेल्वेने अनेक प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्या पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. याबाबत आपण रेल्वेमंत्र्यांना पत्रही दिले होते. कोरोनाचा प्रकोप संपल्यानंतरही काही गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या नाहीत. ही बाब रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली.
गोंदिया मेमू पूर्ववत सुरू करावी, यासह रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, इतवारी-रिवा-इतवारी या रेल्वे गाड्यांना कामठी स्थानकावर थांबा देण्याची विनंती केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी गोंडवाना एक्स्प्रेस व इतवारी- रिवा या गाड्यांना कामठी येथे थांबा देण्यासह नागपूर-गोंदिया मेमू गाडी पूर्ववत सुरू करण्याची हमी दिली.