- सुमेध वाघमारे नागपूर - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ नागपूरच्या मैत्रेय शैक्षणिक संस्थेला देऊन गौरविण्यात आले.
मंगळवारी मुंबई येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजीत पवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. अरबिंद सावंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत २०२०-२१ या वर्षाकरीता मैत्रेय शैक्षणिक संस्थेला ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ प्रदान करण्यात आला. संस्थेच्यावतीने अध्यक्ष मदन माटे यांनी हा पुरस्कार स्विकारला. पुरस्काराचे स्वरुप १५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, चांदीचा स्क्रोल व सन्मानपत्र होते. २००९ पासून कार्यरत असलेली मैत्रेय शैक्षणिक संस्थेची सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शासनाने हा पुरस्कार दिला. या संस्थेद्वारा संचालित अमरावती रोड, नागपूर येथील नागार्जुना इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष मदन माटे व सचिव अजय वाघमारे यांनी सर्व टिमचे कौतुक केले.