लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत भाजपला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना पहिल्या पसंतीची २४ हजार ११४ मते प्राप्त झाली आहेत, तर भाजपचे संदीप जोशी यांना १६ हजार ८५२ मते मिळाली आहेत. वंजारी यांच्याकडे दुसऱ्या फेरीअखेर ७ हजार २६२ मतांची आघाडी होती. ५८ वर्षांपासून शाबुत असलेल्या बालेकिल्ल्यातच पिछाडीवर गेल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून काँग्रेसमध्ये उत्साह दिसून आला.
अपक्ष उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे हे ३ हजार ६४४ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर तर नितेश कराळे हे २९९९ मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
निकाल मध्यरात्रीनंतरच समोर येण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे फारशी अपेक्षा नसतानादेखील मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात ६४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातूनदेखील जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीत वंजारी यांनी ४ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या फेरीत त्यांच्या आघाडीचा आकडा २ हजार ४१२ इतका होता.
दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५१ हजार २३१ मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ४ हजार ७६९ मते अवैध ठरली.