नागपूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुळ गाव असलेल्या धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या उमेदवार मंगला राजेश शेटे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपा समर्थित गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार निशा सुधाकर खडसे यांचा अवघ्या ६ मतांनी पराभव केला.
शेटे यांना २०११ तर तर खडसे यांना २००५ मते मिळाली. १७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.मध्ये कॉंग्रेस समर्थित गटाचे १०, भाजपा समर्थित गटाचे ६ तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात कॉंग्रेस समर्थित गटाचे १८ तर भाजपा समर्थित गटाचे ३ सरपंच विजयी झाले आहेत. मात्र धापेवाडा ग्रा.पं.च्या सरपंचपदाची निवडणूक चर्चेत राहीली. येथे आधी भाजपाच्या निशा खडसे विजयी झाल्याचे जाहीर करीत त्यांच्या समर्थकांनी मतदार केंद्राबाहेर जल्लोष केला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा निकाल जाहीर केला नव्हता. यानंतर कॉंग्रेसकडून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. तीत मंगला शेटे विजयी ठरल्या.