लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील औषध निर्माण कंपन्यांनी मिहान-सेझमध्ये उद्योग सुरू करावा, याकरिता राज्य सरकार पुढाकार घेत आहे. रस्ते, रेल्वे आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीमुळे नागपुरात गुंतवणूक झपाट्याने वाढत असून त्यात औषधी हब होण्याची क्षमता असल्याचे मत औषधी उत्पादकांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.मुंबई सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने औषध निर्माण कंपन्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत फडणवीस यांनी औषध उत्पादकांना मिहान-सेझमध्ये उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री मदन येरावार, महादेव जानकर, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, तांत्रिक सल्लागार एस.व्ही. चहांदे, औषध व अन्न प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, नागपुरातील वेदचे संस्थापक गोविंद डागा, अध्यक्ष देवेंद्र पारेख, सरचिटणीस राहुल उपगन्लावार आणि मुंबई व परिसरातील जवळपास ७० कंपन्यांचे मालक उपस्थित होते. फडणवीस यांनी औषध कंपन्यांना मिहान-सेझमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.यावेळी औषधी निर्र्माण करणाऱ्या कंपन्यांशी १३०० कोटींचे सामंजस्य करार झाले. यात शालिना लॅब प्रा.लि., टोरेन्ट फार्मा, वेल्स फार्मा, केयूर फार्मा, एसजी फार्मा, निकिता केमिकल्स, झिनलॅब लॅब्ज, स्नेहल फार्मास्युटिकल्स, बीडीएच इंडट्रीज, सिद्धायू आयुर्वेद, एसके लॉजिस्टिक, आर्का लाईफ सायन्सेस आणि अन्य कंपन्यांचा समावेश आहे. या करारामुळे नागपूर औषध निर्र्माण हब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिहान प्रकल्पात रखडलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत झालेली गुंतवणुकदारांची बैठक आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विशिष्ट उद्योगावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे आवाहन केले. त्याकरिता विशिष्ट एरियासाठी सल्लागार आणि एजन्सी नेमल्यास संबंधित क्लस्टरचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. काही उद्योजकांनी मुंबई बाहेर उद्योग सुरू करण्यास अनुकूलता दर्शविली. जनेरिक औषध निर्माण कंपन्यांना मिहानसह बुटीबोरी टप्पा-१ आणि टप्पा २ मध्ये जागा देण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शविली.नागपूरसह विदर्भाचा झपाट्याने विकास होत आहे. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, रस्ते, आयआयएम, इंजिनीअरिंग, फार्मासह अन्य व्यावसायिक शिक्षण संस्थांचे जाळे आहे. त्यामुळे नागपूर गुंतवणुकीचे प्रमुख ठिकाण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.