लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही कालावधीत नागपूर विविध गुन्ह्यांसाठी चर्चेत राहिले. २०२० च्या तुलनेत या वर्षात काही गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षात प्रत्येक महिन्याला सरासरी ८ हत्या झाल्या, तर महिलांवरील अत्याचाराच्या १८ गुन्ह्यांची नोंद झाली. मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत हे आकडे जास्त आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत नागपुरात झालेल्या हत्या, महिलांवरील अत्याचार, चोरी, दरोडे, चेन स्नॅचिंग इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०२० साली शहरात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण १७२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२१ च्या पहिल्या पाच महिन्यांतील आकडा ९३ इतका होता.
२०२० मध्ये शहरात ९७ हत्या झाल्या, तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ही संख्या ४१ इतकी होती. शहरात यावर्षी चोरीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली. मागील वर्षभरात २ हजार ६६ चोरीचे गुन्हे नोंदविले गेले, तर यंदा पाचच महिन्यांत ९९० गुन्ह्यांची नोंद झाली. दर महिन्याला सरासरी १९८ चोरीच्या घटना घडल्या.
इतर महत्त्वाच्या गुन्ह्यांतदेखील वाढ
२०२० साली ४ हजार ५४४ इतर महत्त्वाचे गुन्हे दाखल झाले होते. २०२१ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत ही संख्या २ हजार १०७ इतकी होती. दर महिन्याची सरासरी ४२१ इतकी होती, तर २०२० मध्ये हीच सरासरी ३७८ इतकी होती.
गुन्ह्यांची आकडेवारी
गुन्हे- २०२० - २०२१ (मे पर्यंत)
महिलांवरील अत्याचार- १७२ - ९३
हत्या- ९७ - ४१
चोरी- २०६६ - ९९०
दरोडा- १९ -५
आत्महत्या- २२ -६
चेन स्नॅचिंग - २४ - ११
इतर महत्त्वाचे गुन्हे- ४५४४ - २१०७