लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावाचा पूर्णत: कायापालट झाला आहे. फेटरी गावाने कात टाकली असून आज हे गाव सार्वजनिक वाचनालय, अत्याधुनिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्राम पंचायतची नवीन सुसज्ज इमारत आदींसह उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण झाले आहे. इतकेच नव्हे तर या गावाला आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले आहे. आज हे गाव देशातील आदर्श असे गाव ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, आ. समीर मेघे, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, मुख्य वनरक्षक पी. कल्याण कुमार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोवे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, कोणत्याही गावात विकासकामे सुरु असताना गावकऱ्यांची सकारात्मक दृष्टी आणि इच्छाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. फेटरीवासीयांच्या ग्राम विकासातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे आज फेटरी गाव हे आदर्श ठरले आहे. इतकेच नव्हे तर आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.फेटरी गाव आज खूप विकसित झाले असून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार डॉ. विकास महात्मे यांनी यावेळी व्यक्त केला.आ. समीर मेघे यांनीही आपले विचार व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरीचा विकास पाहण्यासाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना येथे आणा, अशी विनंती अमृता फडणवीस यांना केली.यावेळी पंचायत समिती नागपूरच्या सभापती नम्रता राऊत, फेटरीच्या सरपंच धनश्री ढोमणे, पंचायत समिती नागपूरचे उपसभापती सुजित नितनवरे, जिल्हा परिषद सदस्य सुनील जामगडे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर उईके, फेटरीचे उपसरपंच आशिष गणोरकर, सचिव विनया गायकवाड तसेच फेटरीवासी उपस्थित होते.नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात वृक्ष लागवडवृक्ष लागवड मोहिमेंतर्गत फेटरी येथे नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात अमृता फडणवीस यांच्या हस्ते वडाचे रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंंभ करण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषा धारण करून भजनी मंडळाच्या महिला व पुरुषांनी टाळ-मृदंग, ढोल यांच्या साथीने वृक्षारोपण करताना भजनाची साथ दिली. वन विभागाच्या वतीने या परिसरात विविध प्रजातीच्या एकूण २,२७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीमध्ये औषधी गुणधर्म असणाऱ्या विविध ३२ प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले.गावकऱ्यांशी साधला संवाद, विद्यार्थ्यांमध्ये रमल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी हे गाव दत्तक घेतले तेव्हापासून या गावातील विकास कामांवर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जातीने लक्ष ठेवून आहेत. ते फेटरीला अधूनमधून भेट देत असतात. या गावाचा कायापालट जलदगतीने त्यामुळेच होऊ शकला, असे म्हणता येईल. यामुळे फेटरी या गावाशी अमृताताईंचा ऋणानुबंध निर्माण झाला आहे. शनिवारी जेव्हा त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण झाले तेव्हा तो कार्यक्रम केवळ शासकीय खानापूर्ती इतकाच राहिला नाही. अमृताताईंनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. येथील विद्यार्थ्यांमध्ये मनसोक्त रमल्या. त्यांच्याशी चर्चा केली. फोटो काढले.अशी आहेत विकास कामे
- राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत फेटरी नळ पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण, जलशुद्धीकरण केंद्र
- पशुवैद्यकीय दवाखाना
- सांस्कृतिक भवन (खा. विकास महात्मे यांच्या निधीतून)
- नाला दुरुस्ती बांधकाम
- सिमेंट रस्ते
- ग्रामपंचायतची नवीन इमारत
मागील चार वर्षांत सीएसआर फंड, विविध सामाजिक संस्था आणि खासदार व आमदार यांच्या विशेष निधीतून तसेच शासनाच्या विविध विभागांच्या योजनेतून सुमारे २० कोटी रुपयांची विकास कामे फेटरी गावात पूर्ण झाली आहेत.